शरद पवार यांनी आधी देशाचा विचार करावा : मंत्री पीयुष गोयल यांचा हल्लाबोल

शरद पवार यांनी आधी देशाचा विचार करावा : मंत्री पीयुष गोयल यांचा हल्लाबोल
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आधीच पक्षफुटीच्या मुद्दयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता त्यात इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धाच्या नव्या विषयाची भर पडली आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईनची भूमी ताब्यात घेतल्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी आधी देशाचा विचार करावा, असा खोचक सल्ला केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी दिला आहे.

अलीकडेच मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शविला होता. तसेच या मुद्दयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते. पवार यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध जागतिक शांततेला धोका असल्याचे आणि पॅलेस्टाईनची भूमी इस्त्रायलने ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूइंदिरा गांधीराजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका पॅलेस्टाईनला मदत करण्याची होती. परंतु, सध्याच्या पंतप्रधानांनी दुर्दैवाने इस्रायलला पाठिंबा देऊन मूळ मालकांना विरोध केला असल्याचे टिकास्त्र देखील शरद पवार यांनी सोडले होते. त्यावर भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर केलेल्या मतप्रदर्शनातून शरद पवार यांच्यावर शरसंधान केले.

गाझामधील अल अहली रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ५०० जणांचा बळी गेल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त करणारे ट्विट केले होते. त्यानंतर पीयुष गोयल यांनी शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडणारे ट्विट केले. पीयुष गोयल यांनी म्हटले, की शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेबाबत हास्यास्पद वक्तव्ये करतात हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या दहशतवादाच्या धोक्याचा सर्व प्रकारांनी निषेध केला पाहिजे. देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या आणि अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा दहशतवादाशी निगडित विषयात हा बेजबाबदार दृष्टिकोन खेदजनक असल्याची टिका पीयुष गोयल यांनी केली. बाटला हाऊस चकमकीवर अश्रू ढाळणाऱ्या आणि भारतीय भूमीवरील हल्ल्याच्या वेळी निद्रितावस्थेत राहणाऱ्या सरकारचा शरद पवार सहभागी होते. ही कुजलेली मानसिकता थांबवायला हवी. अपेक्षा आहे की आता तरी शरद पवार देशाचा विचार करतील, अशा शब्दात पीयुष गोयल यांनी शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news