मुंबई; पुढारी ऑनलाईन
संपूर्ण आयुष्य शोषित वंचितांसाठी वेचलेल्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे आज कर्मभूमी कोल्हापूरमध्ये निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा प्रकृतीशी संघर्ष सुरु होता. वयाच्या ९३ व्या वर्षी एन. डी. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. एन. डी. पाटील हे नात्याने शरद पवार यांच्या थोरल्या बहिण सरोज पाटील यांचे पती आहेत. शरद पवार यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले.
अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, समाजातील शोषित-वंचितांचा आवाज असणारे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चारित्र्यसंपन्न समतावादी विचारांची पेरणी करणारे असंख्य विद्यार्थी घडविले.विविध सामाजिक चळवळींत ते आयुष्यभर सक्रीय राहिले.
समाजातील सर्व प्रागतिक व पुरोगामी विचारांच्या चळवळींच्या व कार्यकर्त्यांच्या मागे ते नेहमीच भक्कमपणे उभे राहिले.सातत्याने अभ्यास, वाचन, चिंतन आणि लेखन हा त्यांच्या वैचारिक जडणघडणीचे मर्म होते.