Satara Lok Sabha Election : मोदी सरकारविरोधात आसूड उगारा : शरद पवार

 आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या विराट सभेला संबोधित करताना खा. शरद पवार, व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, खा. फौजिया खान, खा. संजयसिंह, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. राजेश टोपे, आ. अनिल देशमुख व इतर.
आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या विराट सभेला संबोधित करताना खा. शरद पवार, व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, खा. फौजिया खान, खा. संजयसिंह, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. राजेश टोपे, आ. अनिल देशमुख व इतर.
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सध्या मोदींमुळे संघर्षाची स्थिती देशावर आली असून त्याला सामोरे जावे लागणार आहे. मोदींनी देशासमोर संकट आणले आहे. शेतकरी संघटनेने आताच मला आसूड भेट दिला. मात्र, त्याचा उपयोग इथं, कुठं करायचा? त्यासाठी दिल्लीला जावे लागेल. देशाचे पंतप्रधान आज या देशातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांची किंमत करत नसतील तर त्यांना योग्य धडा देण्यासाठी हा आसूड उगारावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला. दरम्यान, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आहे. या जिल्ह्यातील कष्टकर्‍यांचा नेता असलेल्या लढाऊ शशिकांत शिंदे यांना तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी संसदेत पाठवा, असे आवाहन खा. पवार यांनी केले.

सातारा लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जिल्हा परिषद मैदानावरील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, खा. संजयसिंह, खा. फौजिया खान, आ. शशिकांत शिंदे, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. अनिल देशमुख, आ. राजेश टोपे, आ. सचिन अहिर, आ. बाळासाहेब पाटील, आ. अरुण लाड, माजी आमदार सदाशिव सपकाळ, उदयसिंह उंडाळकर-पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, डॉ. भारत पाटणकर राजकुमार पाटील, लक्ष्मण माने, साहेबराव पवार, दीपक पवार, डॉ. नितीन सावंत, डॉ. सुरेश जाधव, सचिन मोहिते, विराज शिंदे हर्षल कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांशी सुडाचे राजकारण करत आहेत. शेतकर्‍यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी 10 वर्षात काहीही झालेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी आसूड उगारला पाहिजे. त्यांच्या बर्‍याचशा गोष्टी खोट्या आहेत. उद्घाटने करून मोदी फक्त रिल्स करतात. मोदींच्या विरोधी भूमिका घेणार्‍यांना थेट तुरूंगात धाडले जाते. ही स्थिती बदलण्यासाठी शशिकांत शिदेंना विजयी करणे आपले कर्तव्य आहे.खा. शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे हा माथाडी कामगारांचा नेता आहे. यशवंतराव चव्हाणांचे विचार जपणारा आहे. सामान्य कुटुंबातून आला आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून कष्टकर्‍यांचा आवाज बुलंद करेल याची मला खात्री आहे. यशवंतरावांचे विचार या मतदार संघात टिकवण्यासाठी शशिकांत शिंदे यांना संसदेत पाठवा, असे आवाहन शरद पवारांनी केले.

खा. संजयसिंह म्हणाले, शशिकांत शिंदे हे तुम्हाला नमस्कार घालतात. दुसरीकडे उदयनराजेंना वाटते त्यांना लोकांनी नमस्कार घालावा, मग तुम्ही साथ कोणाला देणार? 84 वर्षांचा हा योध्दा मोदींच्या हुकूमशाहीविरोधात लढत आहे. त्यांच्या मृत्यूची कामना मोदी करत आहेत. शरद पवार ही भटकती आत्मा असे म्हणणे ही मोदींची सडकछाप भाषा आहे. महाराष्ट्राच्या लोकांनी मोदींना याचे उत्तर दिले पाहिजे. ज्याने तुमच्या नेत्याचा अपमान केला त्याला धडा शिकवा. खा. संजयसिंह पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहापुढे झुकले नाही. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्यासमोर झुकले. तिकीटासाठी त्यांना 5 दिवस ताटकळत ठेवले. सोने, दुचाकी चोर्‍यांच्या घटना ऐकल्या. मात्र, इथे पवारांचे घड्याळ आणि उध्दव ठाकरे यांचा धनुष्यबाण चोरला गेला. ठाकरे आणि पवार हे हुकूमशहा हटवण्यासाठीच्या लढाईवर निघाले आहे. जे भाजपला विकले गेले आहे त्यांना धडा शिकवण्याचे काम करा. शिवाजी महाराजांचा एक संदेश आहे की गद्दारांना माफी नाही. तुम्ही गद्दारांना माफ करू नका.

मराठा झुकत नाही तर लढाई करतात, हा आजवरचा इतिहास आहे. एक अशोक चव्हाण गेले दुसरे पृथ्वीराज चव्हाण लढत आहेत. मोदींची हुकूमशाही लोक पाहत आहेत. सर्वांना जेलमध्ये तुम्ही टाकत आहात. पण जनता जेलचे उत्तर वोटमधून देईल. भाजप जर जिंकली तर पुन्हा तुम्हाला मत देण्याचा अधिकार राहणार नाही. येथे पुतीन व किम जोंगचा कारभार येईल. हे सत्तेत आल्यास आरक्षण संपवतील, राज्यघटना संपवतील, असा घणाघातही खा. संजयसिंह यांनी केला. खा. फौजिया खान म्हणाल्या, शशिकांत शिंदे यांच्या विजयाची गॅरंटी इथे मला दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि राज्य घटनेच्या आधारावरू अनेकांनी राज्य केले. मात्र, रयतेला लुटणारे व रयतेचा अधिकार चोरणारे हे सरकार आहे. त्यांनी रयतेच्या बुध्दीवर दरोडा टाकला आहे. बिलकीस बानोच्या बलात्कार्‍यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा शरम वाटली नाही का? बलात्कार्‍यांना तिकीट देण्याचे काम भाजप करत आहे, असा हल्लाबोल खा. खान यांनी केला.

अनिल देशमुख म्हणाले, पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांमध्ये चमत्कार घडणार आहे. तसाच चमत्कार सातारा मतदारसंघातही घडणार आहे. 50-50 कोटी देवून उध्दव ठाकरे यांची शिवसेना फोडली. ईडी व सीबीआयची भीती दाखवून राष्ट्रवादीचे नेते फोडले. त्यामुळेच जनतेत ठाकरे व पवारांविषयी सहानुभूती आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या पण उत्पन्न दुप्पट झाले नाही. हे शेतकरीविरोधी सरकार आहे. मला 14 महिने, खा. संजय सिंह यांना 6 महिने खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकले. या देशात ईडी आणि सीबीआयचा कारभार सुरू आहे. शशिकांत शिंदेंचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनाही अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवारांनी सरकारलाच महाराष्ट्रभर संघर्ष करण्याचा इशारा दिला. ईडी व सीबीआयचा धाक दाखवून विरोधकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच मैदानावर ऐतिहासिक सभा झाली होती आणि यावेळी मतांचा पाऊस शशिकांत शिंदे यांच्यावर पडणार आहे. 'थोडे देर की खामोशी है फिर शोर आयेगा आपका तो वक्त हे हमारा दौर आयेगा,' अशी शेरोशायरीही त्यांनी केली.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मागील निवडणुकीत दोन पक्षांची आघाडी होती पण यंदा तीन पक्ष आहेत. विधानसभांमध्ये मताधिक्क्य देण्यासाठी स्पर्धा आहे. उपमुख्यमंत्री आश्वासनांच्या खिरापती वाटत आहे. कोण मंत्री करतंय, राज्यसभा वाटतंय, तर कोण निधी देतयं. पण याला फार उशीर झाला आहे. सातारकरांनी निर्णय घेतला आहे गद्दारांना निवडून देणार नाही. गद्दारांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आ. राजेश टोपे म्हणाले, हे धर्म युध्द असून आपण धर्माच्या बाजूने आहे. आपण लोकशाहीच्या बाजूने असून हुकूमशाहीच्या विरोधात आहेत. ही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची नगरी असल्यानेच सातार्‍याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, त्यावेळी पक्षातील अनेकांचा विरोध असूनही मी समर्थन केले. ते पक्ष बदलत असताना तेव्हा मी व मुंडे उदयनराजेंना घेवून पुण्याला गेलो होतो. यावेळी पवारांनी तुम्ही महाराष्ट्रभर फिरा व महाराष्ट्रभर नेतृत्व निर्माण करण्याचा सल्ला दिला. ते भाजपमध्ये गेले याचे नाही तर भाजपने तुम्हाला शेवटपर्यंत ताटकळत ठेवले याचे दु:ख आहे. सत्ता व स्वार्थासाठी टीका करणे योग्य नाही. शरद पवारांवर टीका करणारे शिवरायांवर भाजपचे नेते बोलत असताना तुम्ही गप्प का होता? पक्ष फोडला हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पसंत नाही. निवडणूक हातातून जाते असे वाटल्यानंतर काही जणांनी आश्वासन देण्यास सुरूवात केली. खासदारकी व निधी देवू, असे त्यांनी सांगितले. मात्र, समोरच्या उमेदवाराने राजीनामा दिला तर हे शक्य आहे. मात्र, जनता त्यांच्याविरोधात आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या राजीनाम्याशिवाय राज्यसभेचा खासदार कसा करणार? असा सवालही त्यांनी केला. माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचले गेले. यामध्ये माझ्या कुटुंबाला शरद पवार यांनी धीर दिला. त्यामुळेच त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे. ज्यांच्यामुळे ते तीनवेळा खासदार झाले तेच शरद पवारांवर टीका करतात याची खंत आहे. लोकांच्या समस्येला आवाज उठवणारा खासदार म्हणून मी काम करेन, अशी ग्वाही आ. शिंदे यांनी दिली.

यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. सचिन अहिर, आ. बाळासाहेब पाटील, सदाशिव सपकाळ, डॉ. भारत पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी प्रास्तविक केले.

शशिकांत शिंदे जनतेसमोर नतमस्तक

आ. शशिकांत शिंदे भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी खा. शरद पवार यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर विराट जनसमुदायसमोर दंडवत घालत ते जनतेपुढे नतमस्तक झाले तेव्हा जनसमुदायाने जोरदार टाळ्या वाजवल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news