Samruddhi Mahamarg Accident : पावसाची रिपरिप… कीर्र अंधारात मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Samruddhi Mahamarg Accident : पावसाची रिपरिप… कीर्र अंधारात मदतीसाठी सरसावले शेकडो हात


कसारा: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरळाबे कासगाव गावाजवळ पुलाचे काम सुरू असताना सोमवारी (दि.३१) रात्री साडे अकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. सुमारे दीडशे फूट उंचावरून सिमेंटचे गर्डर, लोखंडी सेफ्टी लॉचर आणि क्रेन कोसळली. यात १८ मजुरांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पावसाची रिपरिप… कीर्र अंधार… विखुरलेले मृतदेह… जखमींचा मदतीसाठी सुरू असलेला धावा, अशी दुर्घटनास्थळी अंगावर शहारे आणणारी विदारक परिस्थिती (Samruddhi Mahamarg Accident) दिसत होती.

या दुर्घटनेची (Samruddhi Mahamarg Accident)  बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोमवारी रात्री १ च्या सुमारास घटनास्थळी रात्रीच्या अंधारात सिमेंट, लोखंडी गर्डरच्या महाकाय सांगड्याखाली मृतदेह अस्ताव्यस्त विखुरलेले दिसत होते. तर ढिगाऱ्याखाली अडकलेले काही जण जीवाच्या आकांताने वाचवा, वाचवा अशी आरोळी देत होते. घटनास्थळी दाखल झालेले ग्रामस्थ, पोलीस, महसूल कर्मचारी, शहापुरातील काही मंडळी व आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा व्हॉट्सअॅप ग्रुपची मंडळी मदत कार्यासाठी पुढे सरसावली.

तहसीलदार कोमल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस, महसूल कर्मचारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनचे शाम धुमाळ, मनोज मोरे, विनंद आयरे, प्रसाद दोरे, सुनील करावर, रुपेश भवारी, गणेश शिंदे, फाययाज शेख, प्रकाश गायकर, यांच्यासह उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, प्रांताधिकारी सानप यांच्यासह, शेकडो हातांनी पाऊस, चिखल, गाळ, अंधार याची पर्वा न करता मदतकार्य सुरु केले.

मोबाईल बॅटरीसह सोबत आणलेल्या बॅटरीच्या प्रकाशात ३ जखमी मजूर आणि ५ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मदतीसाठी आलेल्या सर्वांनी आपली सुरक्षितता बाळगून मदत कार्य सुरु ठेवले. पहाटे ४ पर्यत १२ मृतदेह शहापूर ग्रामीण रुग्णाल्यात पाठवण्यात आले. परंतु, त्यानंतर मदतकार्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. ढिगारा, लोखंडी गर्डर उचलण्यासाठी क्रेन, जेसीबीची गरज भासू लागली.

पहाटे क्रेन, गॅस कटर च्या साह्याने लोखंडी पाईप कापण्यास सुरुवात केली. तर मोठे जनरेटर लावून लाईटची व्यवस्था करण्यात आली. कमी क्षमतेच्या क्रेनने लोखंडी गर्डर उचलण्यास मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे काही वेळाने मोठी क्रेन मागविण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ठाण्याहून एनडीआरएफचे पथक सकाळी दाखल झाले. त्यांनी उर्वरित मृतदेह क्रेनच्या मदतीने बाहेर काढले. त्यातच या अपघातात जखमी झालेल्या प्रेम प्रकाश या तरुणाला मानसिक धक्का बसला आहे. घटनास्थळावरील विखुरलेले मृतदेह आणि विदारक परिस्थिती मनाला चटका लावून जात होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news