हिवाळा आणि ज्येष्ठांचे आरोग्य

हिवाळा आणि ज्येष्ठांचे आरोग्य

हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू मानला जात असला तरी वाढत्या थंडीचा काही जणांना त्रासही होऊ शकतो. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना काही त्रासाला सामोरे जावे लागते. कारण या दोन्ही वयोगटांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यामुळे घरातील बाळांची आणि वयस्कर लोकांची अधिक काळजी घ्यावी लागते.

हिवाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात मधुमेह आणि हायपर टेन्शनसारखे आजार असतील तर त्यात वाढ होते. थंडी वाढल्यामुळे रक्तही थोडे घट्ट होते त्यामुळे नसा अधिक संकुचित होतात त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी हृदयाला जास्त श्रम करावे लागतात, हृदयाचे पंपिंग जास्त प्रमाणात होते. हृदयाचे श्रम वाढल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक होतो.

मुळातच ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक

क्षमता कमी झालेली असते आणि या मोसमात ती अधिक कमी होते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक जास्त आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी या व्यतिरिक्त थंडीमुळे डोळेही कोरडे पडतात. अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या आजार असणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी या काळात कोमट पाण्याचे सेवन करावे. जेणेकरून सर्दी, खोकला आणि कफ आदी समस्या भेडसावणार नाहीत. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास त्याचा फायदा होतो.

ज्येष्ठ नागरिक असूनही सकाळी चालण्याचा व्यायाम करत असाल तर चांगले आहे. मात्र या मोसमात सकाळ आणि संध्याकाळ थंडीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे यावेळी चालायला जाणे टाळावे. शरीरात ऊब निर्माण होण्यासाठी दुपारच्या उन्हात एखादा फेरफटका मारता येईल. घरातून बाहेर पडताना शरीर उबदार कपड्यांनी लपेटूनच बाहेर पडावे.

अस्थमा, रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली औषधे वेळेवर न चुकता सेवन करावी. तणाव दूर ठेवण्यासाठी नियमित थोडा व्यायाम करणे उत्तम आहे. हिवाळ्यात तीळ, गूळ, हरभरा, ज्वारी, बाजरी आणि नाचणी सारख्या पदार्थांचे सेवन करावे. हे सर्व पदार्थ शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. सुकामेव्याचे सेवन करावे. रात्री 5 ते 10 बदाम भिजत घालून त्याची साल काढून घ्यावी. 2 अक्रोडही रात्री भिजवून सेवन करावेत. याखेरीज एक चमचा अळशी किंवा जवस वाटून ते दह्यात घालून दिवसातून एक वेळा सेवन करावेत. चाकवत, मेथी आणि पालक, लाल माठ यांसारख्या पालेभाज्यांचे सेवन या दिवसांत आवर्जून करावे.

दातांनी चावणे शक्य असेल तर सायंकाळी थोडेसे फुटाणे किंवा चणे खावेत. या दिवसांत चहाचे सेवन करताना आले, गवती चहा यांचा वापर करा. हिवाळ्यात अति मेद किंवा अति चरबी असलेल्या पदार्थांना दूरच ठेवा. तसेच धूम्रपान, मद्यपानापासून दूर राहा. ज्येष्ठ नागरिकांनी या दिवसांत घराबाहेर पडून व्यायाम करण्यापेक्षा घरच्या घरी प्राणायाम, अनुलोम-विलोम, योगासने करणे हितकारक ठरते. हिवाळ्यातील वातावरणामुळे ज्येष्ठांना नैराश्य जाणवण्याची शक्यता असते. त्यावरही प्राणायाम, मेडिटेशन यांचा फायदा होऊ शकतो.

  • डॉ. संजय गायकवाड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news