पुढारी ऑनलाईन डेस्क : रवा उपमा (Upma Recipe) एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. उपमा बनविण्याची पद्धतही खूप सोपी आहे. सकाळी नाष्त्याला उपमा असणं ही मोठी पर्वणीच असते. उपमा तयार करताना पहिल्यांदा रवा भाजून घेतला जातो आणि भाजलेल्या भाज्या, मसाला आणि पाणी घालून शिजवले जाते. नंतर तळलेल्या काजूने त्याला सजविले जाते, या काजुमुळे रवा उपमा (Upma Recipe) अत्यंत स्वादिष्ट लागतो. स्वादिष्ट उपमा कसा करायचा ते पाहू…
रवा उपमा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
१) चार कप रवा
२) एक टीस्पून चना डाळ (इच्छेनुसार)
३) एक टीस्पून उडदाची डाळ (इच्छेनुसार)
४) चिमुटभर हिंग
५) कढीपत्ता, मोहरी, चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या
६) एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा
७) अर्धा चमचा बारीक कापलेलं आलं
८) तीन टेबलस्पून बारीक चिरलेला गाजर
९) दोन टेबलस्पून फ्रोजन ग्रीन मटर
१०) तीन टेबलस्पून बारीक कापलेली शिमला मिरची
११) बारीक चिरलेला एक टोमॅटो
१२) सहा-सात तळलेले काजू
१३) दोन टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, एक चमचा लिंबाचा रस
१४) चवीनुसार मीठ, १ टेबल स्पून तूप, २ टेबल स्पून तेल आणि पाणी
रवा उपमा बनविण्याची सोपी पद्धत
१) पहिल्यांदा गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात तूप घालून गरम करा. त्यानंतर गरम झालेल्या तुपात रवा घालून व्यवस्थित भाजून घ्या. किमान ५ मिनिटं तो रवा भाजून घ्या. भाजलेला रवा एका पसरट भांड्यात काढून घ्या.
२) त्यानंतर मध्यम गॅसवर पॅनमध्ये तेल घालून चांगलं गरम करून घ्या. त्यानंतर कडलेल्या तेलात चना डाळ, उडीद डाळ, हिंग आणि कढीपत्ता घाला. डाळीला तपकिरी रंग प्राप्त करेपर्यंत भाजून घ्या.
३) त्यात चिरलेला कांदा, आलं आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. थोडा गुलाबी रंग येईपर्यंत तेलात भाजा. नंतर गाजर, मटार, शिमला मिरची, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाका. किमान ३ मिनिटं व्यवस्थित भाजून घ्या.
४) त्यानंतर त्यात पाणी घालून ३ मिनिटांपर्यंत मिश्रण उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा हे पाणी उकळण्यास सुरुवात होईल, तेव्हा त्यात भाजलेला रवा आणि लिंबाचा रस घाला. त्यानंतर व्यवस्थित मिक्स घ्या. त्याच्या गुठळ्या होणार नाहीत, याची दक्षता घेत २-३ मिनिटं चमच्याने हालवत रहा.
५) नंतर पॅनवर झाकण ठेवून उपमा शिजण्यासाठी गॅस मध्यम ठेवा. ३-४ मिनिटं वेळ ठेवा. पण, मधेमधे चमच्याने हालवत रहा. त्यानंतर गॅस बंद करून झाकण काढा आणि १० मिनिटांपर्यंत त्याला सेट होण्यासाठी ठेवा.
६) अशाप्रकारे तुमचा स्वादिष्ट रवा उपमा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये हा उपमा घ्या. त्यावर तळलेले काजू आणि चिरलेली कोथिंबीर टाका, दिसायलाही आणि खायलाही रवा उपमा तयार झाला आहे. चला करा सुरूवात रवा उपमा खायला.
पहा व्हिडीओ : १० मिनिटांत तयार करा उपवासाचे फराळी पकोडे
या रेसिपीज वाचल्या का?