Azam Khan : आझम खान यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी जामीन दिला जावा, अशी विनंती खान यांनी केली होती. तथापि जामिनासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने खान यांना दिले. (Azam Khan)
उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघाचे आमदार असलेले आझम खान हे सध्या सीतापूर तुरुंगात बंद आहेत. आरोपीशी संबंधित खटले अलाहाबादच्या न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यामुळे जामिनासाठी तेथे दाद मागा, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीदरम्यान करण्यात आली.
प्रचारात भाग घेता येउ नये, यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रकरणे लांबवित आहे, असा युक्तिवाद आझम खान यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. (Azam Khan) खान यांच्याविरोधात ४७ गुन्हे दाखल आहेत. खान यांच्याविरोधात राजकारण केले जात असल्याचेही सिब्बल म्हणाले. त्यावर राजकारणाच्या गोष्टी येथे करू नका, असे सांगत न्यायालयाने त्यांना फटकारले.