satej patil vs awade : खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात कोपरखळ्या

satej patil vs awade : खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात कोपरखळ्या
Published on
Updated on

इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या यंत्रमागधारकांच्या संवाद दौर्‍यात आमदार प्रकाश आवाडे यांनी तत्कालिन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या शिफारशींचे जोरदार समर्थन केले. या शिफारसी पुढे कायम ठेवण्याची मागणी लावून धरली. (satej patil vs awade)

हाच धागा पकडत खासदार धैर्यशील माने यांनी आण्णा.. ही काय 'अ‍ॅडजेस्टमेंट', असा चिमटा काढला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हणूनच माझं इचलकरंजीवर विशेष 'लक्ष' आहे असे सांगत येथील राजकारणात अधिक लक्ष देण्याचे संकेत दिले. एकंदरीत या संवाद दौर्‍यापासून भाजप अलिप्त असला तरी भाजपचे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या भोवतीच हा दौरा फिरल्याचे चित्र होते.

satej patil vs awade : शहरात यंत्रमागधारकांची संख्या अधिक

27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांच्या प्रश्नावर कधी नव्हे ते इचलकरंजीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि संघटना वस्त्रोद्योग मंत्री शेख यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पहायला मिळाले. शहरात यंत्रमागधारकांची संख्या अधिक आहे.

येथील यंत्रमागधारक विविध संघटनांच्या बॅनरखाली विखुरला असला तरी वीज दर सवलत बंद झाल्यामुळे नाईलाजास्तव का होईना या वीज बिलाने सर्वांनाच एकत्रीत आणण्याचा प्रयत्न केला.

हा मेळावा काँग्रेस प्रणित असल्यामुळे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे अलिप्त होते. मात्र अनपेक्षितपणे व्यासपीठावर त्यांचे आगमन झाले आणि मेळाव्याचा नूरच पालटला.

काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचे वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ व्यक्तिमत्व असा उल्लेख करीत त्यांना मनोगत मांडण्याची विनंती केली.

यावेळी आवाडे यांनी शाहू मिलच्या जागेवरील रखडलेले संशोधन केंद्र, मेगा टेक्स्टाईल पार्क आदींकडे लक्ष वेधत यापूर्वी वस्त्रोद्योगात प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर या एक सदस्यीय समितीने शिफारसी केलेल्या आहेत.

यापैकी हाळवणकर समितीच्या शिफारसी कोणताही बदल न करता त्यामध्ये अधिक काय देता येईल ते देवून पुढे सुरू ठेवाव्यात अशी हात जोडून शेख यांच्याकडे विनंती केली. त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी हाच धागा पकडत राजकारणात अनेकवेळा संघर्ष पाहिला आहे.

परंतु आमदार प्रकाश आवाडे यांनी आवाडे समितीच्या शिफारसींची मागणी न करता हाळवणकर समितीच्या शिफारसी कायम ठेवण्याची मागणी केली याकडे लक्ष वेधत आण्णा.. ही काय नवीन अ‍ॅडजेस्टमेंट, अशी थेट विचारणाच केली.

यावर सभागृहात एकच हास्यकल्लोष उडाला आणि त्यातच जागेवरून प्रकाश आवाडे यांनी नगरपालिकेला नाही असे सांगत ताराराणी पक्षाच्या माध्यमातूनच स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले.

त्यावर पालकमंत्र्यांनीही म्हणूनच इचलकरंजीवर मी अधिक लक्ष देत असल्याचे सांगत तुम्ही नसला तरी काँग्रेसची दुसरी फळी घेवून नगरपालिका निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचा सूचक इशाराच दिला. एकंदरीत यंत्रमाग प्रश्नावरील गंभीर विषयातही या राजकीय कोपरखळ्यांनी वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news