सातारा पुढारी वृत्तसेवा : मी ज्या ठिकाणी राहत होतो तो परिसर आता उद्ध्वस्त झाला असल्याचा थरारक अनुभव युक्रेन रिटर्न असलेल्या शार्दल जाधव याने दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितला. मात्र त्याचवेळी भारतापेक्षा युक्रेनला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळत असल्याचे सांगत पुढील शिक्षण हे युक्रेनलाच पूर्ण करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.
सातार्यातील केसरकर पेठेत राहणारा शार्दुल जाधव हा दोनच दिवसांपूर्वी सातार्यात आला. यानंतर दै. 'पुढारी'ने रशिया-युक्रेन युध्दातील थरारक अनुभव व प्रवासातील प्रसंग जाणून घेण्यासाठी जाधव याच्याशी संवाद साधला.
युक्रेनची सध्याची परिस्थिती काय व तुझा प्रवास कसा झाला? असे विचारले असता शार्दुल म्हणाला, युक्रेनमधील खासदिव शहरात सहा महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी आलो. परंतु, त्यापूर्वीच म्हणजे 2014 पासून रशिया आणि युक्रेनची परिस्थिती तणावग्रस्त होती.
परंतु, युध्द होईल, अशी काणकुणही नव्हती. परिस्थिती चिघळत गेली अन् देशातील इतर शहरांमध्ये मिसाईल हल्ले होण्यास सुरूवात झाली. चर्चा व बातम्यांमध्ये युक्रेनमधील सर्वच शहरांमध्ये युध्दजन्य परिस्थिती होणार असल्याची खात्री पटल्यानंतर युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतात येण्यासाठी विमानाचे तिकीट मिळवण्यात बर्याच अडचणी आल्या.
तीन दिवस प्रयत्न केल्यानंतर एक तिकीट मिळाले. यानंतर परिस्थिती संपूर्ण बदलली अन् पूर्ण देशातच युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली. मी सातार्यात पोहचल्यानंतर दुसर्या दिवशी मी राहत असलेल्या परिसरात हल्ला झाल्याचे समजताच धक्का बसला.
ज्या ठिकाणी तू शिकत आहे त्या ठिकाणची परिस्थिती काय व पुढील शिक्षणात काय अडचणी येणार आहेत? असे विचारले असता शार्दुल म्हणाला, आताची परिस्थिती फारच बिकट झाली असून मी राहत असलेले आता सर्वच उदध्वस्त झालेले आहे.
शिक्षणासाठी आता पूरक वातावरण नाही. भविष्यातील शिक्षणाचे काय? पुढील शिक्षण कसे घेणार? असे विचारले असता शार्दुल म्हणाला, माझे त्या ठिकाणी अॅडमिशन आहे. माझी सर्व मूळ कागदपत्रे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. युध्दाची परिस्थिती फार बिकट असल्यामुळे कॉलेज बंद आहे. अॅम्बेसीने एक फॉर्म दिला असून फेसबुकद्वारे तो सबमिट केला. यामध्ये सध्याचे लोकेशन व इतर माहिती भरण्यास सागितली.
युध्दजन्य परिस्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना मिळालेल्या वागणूकीबद्दल काय सांगाल? असे विचारले असता ते म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांना चांगली वागणूक मिळाली. गाड्यांवर भारताचा झेंडा लागला त्याकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहत नव्हते. ज्यावेळी शार्दुल व त्याचे मित्र निघाले त्यावेळी एअरपोर्टवर सुध्दा त्यांंच्या कागदपत्रांची तपासणी पटापट झाली.
विमानाचे तिकिट मिळत नव्हते अन् घरच्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता
युक्रेनवर रशियाने हल्ले करण्यास सुरूवात झाल्यानंतर शार्दुलचे वडील व आई यांना धास्ती लागून राहिली. युध्दजन्य परिस्थिती असल्याने बंकर्समध्ये दिवस काढावे लागले. त्यातच दोन दिवस विमानाचे तिकीट फायनल न झाल्याने घरच्यांच्या डोळ्यास डोळा लागला नाही. तिकडे काय परिस्थिती असेल? आपल्या मुलाचे काय झाले असेल? यासह असंख्य प्रश्नांचे काहूर माजले. त्यामुळे युध्द युक्रेनमध्ये अन् विचारांची कालवाकालव सातार्यात होत असल्याचे दिसून आले.