पुढारी ऑनलाईन ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देउन स्वत:चा पक्ष काढावा आणि ५ आमदार निवडून आणावेत असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. शिंदे गटातील सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नावाने मते मागून निवडून आले आहेत. असे असताना त्यांनी पक्षाशी गद्दारी करून स्वत:चा वेगळा गट केला. पण त्यांना आपण गद्दारी केली नाही असे जर वाटत असेल, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि स्वत:चा पक्ष काढून निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आव्हान दिले. यावेळी राज्यात चोरांचे राज्य सुरू असल्याची टीका केली.
उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये महागर्जना सभा
उद्या (रविवार) उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा महागर्जना सभा होणार आहे. या सभेला लाखो लोकांची गर्दी होईल. यात मुस्लीम बांधवही मोठ्या संख्येने उपस्थिती लावतील. जनतेची चीड या महासभेतून दिसून येईल. तसेच भविष्यात मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाल्याचे दिसेल.
उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय यांचे राजकारण होत नाही
देशात लोकशाही टिकवायची असेल तर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे. आज अनेक मुस्लीम बांधवांनी ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. हा देश सर्व जाती, धर्माच्या लोकांचा आहे. आज देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या विषयी भीती आहे. त्यामुळेच ते सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. ज्या घाई गडबडीत संसदेतील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाला देण्यात आलं त्यावरून हा सर्व फ्रॉड असल्याचं ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी गुडघे टेकले नाहीत..
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सर्व परिस्थितीतही गुडघे टेकले नाहीत. त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो. विरोधकांना नष्ट करण्यासाठी या प्रकारच दळभद्री राजकारण सुरू आहे. राहुल गांधी यांना धडा शिकवण्यासाठी आणि संसदेत बोलू न देण्यासाठी त्यांच्या विरूध्द ही कारवाई झालेली आहे. असे जरी असले तरीही राहुल गांधीचं नेतत्व कालच्या कारवाईमुळे उजळून निघेल आणि इंदीरा गांधींप्रमाणे त्यांचे कर्तुत्व सिद्ध होईल अशी भूमीका संजय राऊत यांनी मांडली.
हेही वाचा :