पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. हा राजकीय भूकंप नाही, या गोष्टी घडणारच होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची ही सुरूवात झाली आहे. शिंदे फार काळ मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत. लवकरच महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२) राजकीय घडामोडीवर प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
राऊत म्हणाले की, ,सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार आहेत. त्यामुळे शिंदे गट बेकायदेशीर ठरणार आहेत. परिणामी अजित पवारांच्या पाठिंब्याची गरज भाजपला होतीच. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीने मोहीम राबवली होती. यावर आता भाजप काय बोलणार हे पाहावे लागेल. शपथविधीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. शिंदे सरकारला लोकांचा पाठिंबा नाही. भविष्यात आम्ही सर्वजण एकत्र राहू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केले.