सार्वजनिक शौचालय टेंडर प्रकरणी संजय पानसरे पोलीस कोठडीत

सार्वजनिक शौचालय टेंडर प्रकरणी संजय पानसरे पोलीस कोठडीत

कोपरखैरणे : पुढारी वार्ताहर : एपीएमसी फळ बाजारातील सार्वजनिक शौचालय टेंडर प्रकरणी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी चौकशी केल्यानंतर दुपारी चार वाजता त्यांना अटक केली.

याप्रकरणी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्याने त्यांची अटक तूर्त टळली आहे. भाजी मार्केट संचालक शंकर पिंगळे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळूंज यांची चौकशी करण्यात आली आहे.

एपीएमसीमधील सार्वजनिक शौचालय चालवायला द्यायचे टेंडर 2018 रोजी काढण्यात आले होते. सुरेश मारू या ठेकेदाराला हे काम मिळाले होते. या ठेकेदाराने वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने फळ आणि भाजीपाला मार्केट मध्ये 12 सार्वजनिक शौचालय चालविण्यास घेतली महिन्याला एका शौचालयामागे दीड ते 3 लाख रूपये एपीएमसी प्रशासनाला ठेकेदार देणार होता.

सार्वजनिक शौचालये चालविण्याचा ठेका आपल्यालाच मिळावा म्हणून सुरेश मारूने अव्वाच्या सव्वा भाड्याचे दर लावून टेंडर मिळवले होते. एकदा ठेका मिळाला की एपीएमसीमधील संचालकांना हाताशी धरून भाड्याची रक्कम कमी करून घेण्याची पध्दत सुरेश मारू याने आत्मसात केली होती.

या सर्व प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर क्राईम ब्रॅन्चकडून याचा गेल्या तीन वर्षापासून तपास सुरू होता. 7 कोटी 61 लाख रूपये थकबाकी होवूनही ठेकेदाराला पाठीशी घालण्यात एपीएमसीच्या संचालक मंडळाचा आणि प्रशासनातील अधिकार्‍यांचा हात असल्याचे तपासात पुढे आल्याने 13 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील 5 जणांना अटक करण्यात आली असून 7 फरार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news