सांगली : भाजपसारखं पुढचं बोलायची सवय नाही: जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश होतील त्या त्या वेळी कळवू, भाजपसारखं पुढचं बोलायची सवय नाही, असा टोला पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी शिराळा येथे माजीमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर पालकमंत्री पाटील म्हणाले, शनिवारी एक पक्षप्रवेश आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे भाजप सोडून राष्ट्रवादीत येत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. भाजपसारखं पुढचं बोलायची सवय नाही, पण भाजपमधून राष्ट्रवादीत जसजसे प्रवेश होतील, त्या त्या वेळी कळवू.

पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र 'मॉडेल आरोग्य केंद्रे' करायची असे मी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठरवले आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे उपकेंद्र 'फाईव्ह स्टार' दर्जाची असावीत, असा प्रोजेक्ट केला आहे. त्याची सुरुवात शरद पवार यांच्याहस्ते होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण शनिवारी पवार यांच्याहस्ते व अनेक मान्यवर नेते, मंत्री यांच्या उपस्थित होणाार आहे.

मंत्री पाटील व डांगे यांनी शुक्रवारी अहिल्यादेवी होळकर स्मारक ठिकाणी भेट दिली. कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे राहुल पवार, शेखर माने, नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते.

शहाणपण शिकले पाहिजे : अण्णा डांगे

अण्णा डांगे म्हणाले, राजकारण कुठे करायचे, धर्मकारण व समाजकारण कुठे करायचे हे शहाणपण माणसाने शिकले पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते माजीमंत्री अण्णा डांगे यांनी लगावला. शनिवारी लोकार्पण सोहळ्याला मोठी गर्दी होईल. मांडव कमी पडेल, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news