सांगली : बदलत्या हवामानामुळे कमी वेळेची पिके घ्या

सांगली : बदलत्या हवामानामुळे कमी वेळेची पिके घ्या

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सध्या शेती आणि शेतकर्‍यांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी कालावधीची पिके घ्यावीत, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

दैनिक पुढारी माध्यम समूह आणि कृषी विभागातर्फे आयोजित 'अ‍ॅग्री पंढरी' या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ना. कदम यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील, पोलिस उपअधीक्षक सुरेखा दुग्गे, पुढारीचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार वेताळ, ऑरबीट गु्रप ऑफ कंपनीज्चे चेअरमन दीपक राजमाने, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कुट्टे गु्रपचे सेल्स मॅनेजर सतीश पवार, केसरी टूर्सच्या संचालिक झेलम चौबळ, रॉनिक वॉटर हिटरचे तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री कदम म्हणाले, कोरोना काळात शेती व शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले. शेतकर्‍यांना नवी उभारी व आधुनिक तंत्रज्ञान मिळण्यासाठी 'पुढारी'ने सुरू केलेला हा उपक्रम खूपच चांगला आहे. अलिकडच्या काळात हवामान सतत बदलत आहे. याचा फटका शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. शेतकरी कष्ट करीत आहेत, पण नैसर्गिक संकटे व बाजारभाव यामुळे पुरेसा नफा राहत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी बदलत्या वातावरणानुसार क्रॉप पॅटर्न बदलण्याची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कमी वेळेत येणारी पिके घेण्याची सध्याच्या काळात आवश्यकता निर्माण झाली आहे. 'पुढारी' चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रत्ना पाटील यांनी केले.

'पुढारी'च्या उपक्रमाच्या पाठिशी; शेतकर्‍यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा : मंत्री डॉ. कदम

मंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, दैनिक पुढारी नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठिशी उभा राहतो. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून 'पुढारी'ने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम खूपच चांगला आहे. कृषी मंत्री म्हणून मी या उपक्रमाच्या पाठिशी आहे. चांगले नियोजन पाहून पुढारीच्या टीमने केलेले कष्ट दिसून येते. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

logo
Pudhari News
pudhari.news