सांगली : पुढारी वृत्तसेवा यंदा ऊसाला पहिली उचल एफआरपी अधिक 100 रूपये द्या, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वसंतदादा कारखान्यावर ( दत्त इंडिया) आज (रविवार) आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या गेटमधून कारखान्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे पोलिस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
कोल्हापुरात गेल्या वर्षाचे 100 रूपये आणि चालू वर्षाचे एफआरपी अधिक 100 रूपये असा फॉर्म्युला ठरला होता. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वीकारावा या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने दि. 8 डिसेंबरपर्यंत कारखानदारांची बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप बैठक ही नाही आणि तोडगा ही निघाला नाही. त्यामुळे आज (रविवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वसंतदादा कारखान्याच्या दारात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
कारखाना स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत कारखान्याच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.