नागज; पुढारी वृत्तसेवा : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील डोंगरावर निर्जनस्थळी जत तालुक्यातील प्रेमी युगुलांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी हा प्रकार घडला. संबंधितांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जत तालुक्यातील प्रेमी युगुल गेल्या पाच-सहा दिवसापासून बेपत्ता होते. दरम्यानच्या काळात त्या दोघांनी लग्न केले होते. लग्न केल्याने आई-वडील घरात घेत नाहीत म्हणून ते दोघेही बाहेर फिरत होते. त्यांच्याकडील पैसे संपल्यानंतर शनिवारी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
नागज हद्दीतील आरेवाडीच्या बिरोबा मंदिराच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी जत पोलिसांना फोन करून सांगितले. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांमार्फत तत्काळ शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, विषारी औषध प्राशन करून दोघेजण डोंगरावर एका झाडाखाली अंगावर चादर घेऊन झोपलेल्या स्थितीत एका मेंढपाळाला आढळले.
ढालगावचे पोलिसपाटील व स्थानिक युवकांनी घटनास्थळी जाऊन त्या युगलांना डोंगरावरून खाली आणले. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.