सांगली : सोयाबीन महाबीजच्या दारात ओतणार

सांगली : सोयाबीन महाबीजच्या दारात ओतणार

सांगली ; पुढारी वृत्तसेवा :

पलूस तालुक्यातील धनगाव परिसरातील 200 एकरमधील निकृष्ट सोयाबीन महाबीज व कृषी खात्याच्या दारात नेऊन ओतणार आहे, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

याबाबत शेतकरी दीपक भोसले, प्रदीप साळुंखे, शरद साळुंखे, अनिल साळुंखे, शंकर यादव, बाळासो यादव, वैभव पाटील, अक्षय साळुंखे, मनसेचे अंकुश पाटील यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाबीज कंपनीने शेतकर्‍यांना बियाणे उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यास सांगितले. पण बियाणे निकृष्ट असल्याने सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत.

काही प्लॉटमध्ये शेंगा लागल्या पण त्या किडीस बळी पडल्या. काही अधिकार्‍यांनी केवळ पाहणीचे नाटक केले. सरकारी यंत्रणेनेही मदतीचे फक्त आश्वासन दिले आहे. प्रत्येक शेतकर्‍याचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काढणीही परवडत नाही. त्यामुळे काहींनी उभ्या पिकावर नांगर, रोटर फिरविला आहे. निवेदनात म्हटले आहे की, एकरी केवळ चार पोती उतारा पडत आहे. निघालेले सोयाबीनही निकृष्ट आहे. बाजारभाव प्रतिक्विंटल सात हजार असताना व्यापारी पाच हजारांसही हा माल घेत नाहीत. यामुळे शेतकर्‍यांनी हे सोयाबीन महाबीजच्या कार्यालयासमोर नेऊन ओतणार असल्याचे सांगितले आहे. तसेच एकरी एक लाख रुपयांची भरपाई न दिल्यास कृषी खात्याच्या पलूस व सांगली कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news