ऐतवडे खुर्द : पुढारी वृत्तसेवा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द- चिकुर्डे रस्त्यावर देवर्डे जवळ अज्ञात वाहनाचा धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. आज (बुधवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आली. पूर्ण वाढ झालेला अंदाजे तीन वर्षाचा नर जातीचा हा बिबट्या आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात ऐतवडे खुर्द, चिकुर्डे, देवर्डे, करंजवडे परिसरात बिबट्यांचे दर्शन शेतकरी वर्गाला सातत्याने होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्यात तसेच महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे याची दखल वन विभागाने घेऊन तातडीने यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही ग्रामपंचायत द्वारे केली होती. परंतु याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले होते. सध्या या दुर्लक्षामुळेच बिबट्या ठार झाला असल्याची चर्चा ग्रामस्थातून सुरू आहे.
बुधवारी अज्ञात वाहणाच्या धडकेत बिबट्या ठार झाला आहे. यावेळी मृत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कुळरप पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.