मंत्री करण्यासाठी शंकरराव गडाख यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी खोके घेतले; संदीपान भुमरेंचा खळबळजनक आरोप

संदीपान भुमरे
संदीपान भुमरे

औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंधारण मंत्री करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांच्याकडून खोके घेतले होते, असा खळबळजनक आरोप रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आज (दि.३०) येथे केला. शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात ते बोलत होते. कृषिमंत्री अब्दुल सतार, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री भुमरे म्हणाले की, आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप शिवसेना पक्ष प्रमुख करत आहेत. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंधारण मंत्री करण्यासाठी ठाकरे यांनी अपक्ष आमदार गडाख यांच्याकडून खोके घेतले होते. जलसंधारण मंत्री पदासाठी त्यांना शिवसैनिक का दिसला नाही ? इतर अपक्ष आमदार का दिसले नाहीत? असा सवाल करून उद्धव ठाकरे यांनी गडाख यांच्याकडून किती खोके घेतले, हे मला माहीत आहे असे वक्तव्य केले.

स्थानिक आमदारांना डावलून औरंगाबादचे पालकमंत्रीपद सुभाष देसाई यांना दिले. देसाई आम्हाला भेटत नव्हते, सुभाष देसाई, अनिल परब हे मातोश्रीला चिटकलेले गोचीड असल्याची टीका भुमरे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांच्या जून महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या सभेसाठी चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून २० लाख रुपये घेतले होते. सतार व माझ्याकडूनही पैसे घेण्यात आले. सभा आम्ही यशस्वी केली. पण ठाकरे यांनी आमदार अंबादास दानवे यांना श्रेय दिले, अशी खंत भुमरे यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news