सना खान खून प्रकरण : आमदार शर्मा चौकशीसाठी नागपुरात हजर

सना खान खून प्रकरण : आमदार शर्मा चौकशीसाठी नागपुरात हजर

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढतच आहे. मानकापूर पोलिसांनी या प्रकरणात नरसिंहपूर जिल्ह्यातील आमदार संजय शर्मा यांना हजर होण्याची नोटीस पाठविली होती. बुधवारी (दि. २३) येऊ न शकलेले आमदार संजय शर्मा आज (दि. २४) चौकशीसाठी आपल्या समर्थकांसह नागपुरात दाखल झाले. हॉटेल सेंटर पॉईंट येथे मुक्कामी असलेल्या संजय शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. सीताबर्डी येथील झोन २ डीसीपी कार्यालयात यानंतर ते हजर  झाले. सना खानच्या हत्येप्रकरणी आपली कुठलीही भूमिका नाही आणि मुख्य आरोपी अमित साहू यांच्याशी आपले काहीच घेणे देणे नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. याचवेळी पोलिसांशी चर्चेनंतर अधिक स्पष्टता करणार असल्याचे सांगितले.

सना खान हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत आहेत. ही हत्या की, कुणी सुपारी किलिंग केले, नागपुरातील कुणाचे काय हितसंबंध आहेत यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील प्रमुख राजकीय नेत्यांचा सनाशी संबध असल्याचे सांगण्यात येत आहे. सना खान हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अमित उर्फ पप्पू साहू, कमलेश पटेल, अमित यांचा मित्र राजेश सिंग, नोकर जितेंद्र गौड व धमेंद्र यादव या पाच जणांना अटक केली. आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार २ ऑगस्टला सकाळी सना यांची हत्या केल्यानंतर अमितने सनाकडील तीन मोबाइल आपल्या विश्वासू धर्मेंद्रला दिले. धमेंद्रने तिन्ही मोबाइलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खास मित्र कमलेश पटेलकडे सोपविली.

धर्मेंद्रच्या अटकेनंतर पोलिसांनी मोबाइलबाबत कमलेशचे नाव समोर आले. सोमवारी (दि. २२) पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता जबलपूरमधील मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ एक मोबाइल लपविला असून अन्य दोन मोबाइल नर्मदा नदीतील धरणात फेकल्याची माहिती कमलेशने पोलिसांना दिली. मात्र, कमलेशने ते दोन मोबाईल धरणात फेकले नसून इतर ठिकाणी लपविल्याची पोलिसांना शंका आहे. अमितच्या ताब्यातील दोन मोबाईलचा तपास सुरू असून या हत्येनंतर अमित कुठे गेले, कुणाच्या संपर्कात होते याविषयीची एकेक कडी पोलीस जुळवत आहेत. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या सना खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सना खान दोन ऑगस्टला जबलपूरला गेल्यावर ३ ऑगस्ट रोजी अमित ऊर्फ पप्पू साहू यांनी त्यांचा खून केला. त्यानंतर सना यांचा मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती मृतदेह आढळला नाही.

आरोपी अटकेत असताना 24 दिवस उलटूनही आपल्या मुलीचा मृतदेह सापडत नाही, हनी ट्रॅपच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. लवकरच आपण सविस्तर बोलू असे सना खान यांच्या आईने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news