पुढारी ऑनलाइन डेस्क : काळवीटाची शिकार केल्या प्रकरणी सलमान खानने Salman Khan माफी मागावी, अन्यथा त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवू, अशी धमकी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने एबीपी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. एबीपी हिंदी वृत्तवाहिनीकडून लॉरेन्स बिष्णोई याची तुरुंगातून मुलाखत घेतली. यावेळी सलमान खानवर बिष्णोई याने आपला राग व्यक्त केला.
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा सध्या गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याकांड प्रकरणी तुरुंगात आहे. एबीपी हिंदी वृत्तवाहिनीने त्याची तुरुंगातून मुलाखत प्रसारित केली आहे. यावेळी सलमान खानचा मुद्दा उपस्थित केला असता. लॉरेन्सने आपला सलमानवरील राग व्यक्त केला. तो म्हणाला सलमान खानने आमच्या समाजाची माफी मागावी, अन्यथा एक ना एक दिवस त्याचा अहंकार नक्कीच तोडू…
आमचा समाज ज्या परिसरात राहतो तिथे आमचे मंदिर आहे आणि आम्ही त्या संपूर्ण परिसरात जीव हत्येला प्रतिबंध केला आहे. आम्ही वृक्षांची पूजा करतो. त्यामुळे वृक्षतोडीला देखील आमचा विरोध आहे. अशा ठिकाणी सलमान खानने काळवीटाची शिकार केली. इतकेच नाही त्याने आमच्या समाजाचा खूप अपमान केला आहे. ही घटना घडली त्यावेळी मी अवघ्या 4-5 वर्षांचा होतो. लहानपणापासूनच माझ्या मनात त्याच्याविषयी राग आहे. त्यामुळे सलमानने आमच्या समाजाची माफी मागावी अन्यथा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ, असे बिष्णोई म्हणाला.
फक्त स्वतःची दहशत पसरवण्यासाठीच किंवा बॉलीवूडमध्ये दहशत व्हावी या हेतूने सलमानच्या मागे पडला आहेत का? कारण काळवीटच्या शिकारप्रकरणी त्याच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला आहे. त्याला दंड आणि शिक्षा झाली आहे. मग सलमानने माफी मागावी असा अट्टाहास का आहे, बॉलीवूडमध्ये दहशत असावी यासाठी करत आहात का हे सर्व असे विचारले.
यावेळी बिष्णोईने सांगितले की बॉलिवूडमध्ये दहशतच पसरवायची असती तर शाहरूख खानला मारले असते. किंवा अन्य कोणत्याही अॅक्टरला मारले असते. आमचा असा काही विचार नाही. सलमान खान खूप अहंकारी आहे. त्याने आमच्या समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याचा अहंकार तोडणे गरजेचे आहे.
यावेळी सलमान खानला मध्यंतरी जीवे मारण्याची एक चिठ्ठी मिळाली होती ती तूच पाठवली होतीस का, असे विचारले असता लॉरेन्स याविषयी मात्र स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला मी तर तुरुंगात आहे, त्या चिठ्ठीचा माझ्याशी काही संबंध नाही. हो पण सलमानने जर माफी मागितली नाही, तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ, त्याला चांगलाच धडा शिकवू… असे लॉरेन्सने पुन्हा पुन्हा म्हटले.
हे ही वाचा :