मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार करण्यात आलेले पिस्तूल शूटरने गुजरातच्या तापी नदीत फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गुन्ह्यांतील पिस्तूलसाठी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तापी नदी ऑपेशन हाती घेतले आहे. त्यापैकी एक पिस्तूल हस्तगत करण्यात रात्री उशिरा गुन्हे शाखेला यश आले आहे.
सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पळून गेलेल्या विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोन्ही शूटरना गुजरातच्या भूज येथून पोलिसांनी अटक केली होती.
अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या दोघांना गोळीबारासाठी दोन पिस्तूल देण्यात आले होते. घटनेच्या वेळेस विकीकुमार बाईक चालवत होता तर सागरकुमारने सलमानच्या घराजवळ पाच ते सहा गोळ्या फायर केल्या होत्या. पुरावा नष्ट करताना त्यांनी मुंबईहून गुजरातला जाताना तापी नदीत दोन्ही पिस्तूले फेकून दिली होती. गोळीबार प्रकरणात न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्या पिस्तूलचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सोमवारी सकाळी गुन्हे शाखेचे बारा ते पंधराजणांचे एक पथक गुजरातच्या तापी नदीजवळ दोन्ही आरोपींना घेऊन गेले होते. आरोपींच्या माहितीनंतर सुरत पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने काही मच्छिमाराच्या सहाय्याने ते पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळपर्यंत ही शोधमोहीम सुरु होती. रात्री उशिरा एक पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तापी नदीची खोली अरुंद आणि सतत वाहते पाणी असल्याने ते पिस्तूल शोधणे गुन्हे शाखेसाठी एक आव्हान आहे. मंगळवारी पुन्हा गुन्हे शाखेचे अधिकारी मच्छिमाराच्या मदतीने दुसरे पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.