गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्याही रडारवर

file photo
file photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी 'अफजलाच्या औलादी, मी असल्या गादींच्या छत्रपतींना मानत नाही,' असे बोलून ऐन मराठा आरक्षणाच्या काळात खळबळ उडवून देणार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत अटकेची कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. सोमवारी मुंबईत मोठ्या लवाजम्याने पोलिस त्याच्या अटकेसाठी गेले होते. मात्र, रिकाम्या हाताने ते परत आले.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी राजेंद्र बापूराव निकम (वय 42, रा. तारळे ता.पाटण जि.सातारा) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत राजेंद्र निकम यांनी दिलेल्या मूळ तक्रारीत म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सहा वर्षांपासून मोठा लढा सुरु आहे. 2020 मध्ये मराठा समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे आरक्षण व इतर मागण्यांच्या अनुषंगाने बैठका होत होत्या. दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी संपन्न झाली होती.

बैठक झाल्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता मुंबई येथील एका वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षणावर कार्यक्रम सुरू होता. थेट प्रक्षेपण सुरू असताना तक्रारदार यांनी पाहिले की त्यावर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते मत मांडत होते. सदावर्ते त्यांचे मत मांडत असताना दोन्ही राजांविषयी म्हणाले की, 'अफजलाच्या औलादी, मी असल्या छत्रपतींच्या गाद्यांना मानत नाही.' अशा प्रकारे वक्तव्य करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा एकेरी उल्लेख करुन मराठा समाजाचा अपमान होईल, असा शब्दोच्चार सदावर्ते यांनी केला. तसेच या वक्तव्यामुळे तेढ निर्माण होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होवून दंगली भडकतील, असे कृत्य असल्याचे तक्रारदार राजेंद्र निकम यांनी म्हटले आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दुर्देवाने गेल्या दीड वर्षात अ‍ॅड. गुणरत्न यांना सातारा शहर पोलिसांनी अटकच केली नाही. ही बाब सोमवारी उघड झाली. कारण सध्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्लाप्रकरणी संशयित आरोपी म्हणून मुंबई पोलिसांकडे अटकेत आहे.

दाखल असलेला गुन्हा निकाली काढण्यासाठी व अटकेची कारवाई करण्यासाठी सातारा शहर पोलिसांचा लवाजमा सोमवारी सकाळी मुंबईत दाखल झाला. दुपारी सदावर्ते यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पुन्हा वाढवून पोलिस कोठडी मिळाली. यामुळे सातारा पोलिसांच्या हाती सध्या तरी काहीच लागले नाही.

वेळीच कारवाई न झाल्यामुळे फोफावले स्तोम…

सातारा पोलिसांकडे दीड वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. मुळात सदावर्ते यांच्यावर इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. मात्र कोणी कारवाई न केल्याने ते सुसाट सुटले होते. आता खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी घावल्याने सातारासह इतर पोलिसही खडबडून जागे झाले आहेत. यातून त्यांनी मुंबई गाठली. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत कोणी-कोणी तपास केला? तपास काय झाला आहे? आतापर्यंत एवढा उशीर का झाला? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news