मुख्यमंत्रिपद सोडा, शिवकुमारांना द्या

चंद्रशेखर स्वामींचा सिद्धरामय्यांना सल्ला
Chandrasekhar Swami
मुख्यमंत्रिपद शिवकुमारांना द्या, असा सल्ला चंद्रशेखर स्वामींनी सिद्धरामय्यांना दिलाPudhari File Photo

बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडा, अशी सूचना भर सभेत विश्व वक्कलिग महासंस्थानचे मठाधीश चंद्रशेखर स्वामींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना केली आहे. त्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री बदलाला पुन्हा तोंड फुटले आहे. मी स्वतः निर्णय घेत नाही, तर पश्रक्षेष्ठी जो आदेश देतील तो पाळू, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी म्हटले आहे. तर चंद्रशेखर स्वामी स्वतःचे पद सोडतील का, असा प्रश्न मंत्री राजण्णा यांनी करून सिद्धरामय्यांची पाठराखण केली आहे. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मात्र यावर काहीही भाष्य केलेले नाही.

गुरुवारी केंपेगौडा जयंती सोहळ्यात चंद्रशेखर स्वामी यांनी व्यासपीठावरूनच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना शिवकुमारांसाठी मुख्यमंत्रिपद सोडण्याची सूचना केली. स्वामी म्हणाले, राज्यातील अनेकांना मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. परंतु, शिवकुमार यांना अद्याप संधी मिळाली नाही. यामुळे ती शिवकुमार यांना द्यावी. सिद्धरामय्याजी, तुम्हाला राजकारणाचा चांगला अनुभव आहे. यामुळे शिवकुमार यांना एकदा संधी देण्यास हरकत नाही. तुम्ही मुख्यमंत्रिपद सोडा. तुम्ही इच्छा दाखविली तर हे शक्य आहे. कृपा करून शिवकुमारांना एकदा संधी द्या. यावेळी व्यासपीठावर सिद्धरामय्या यांच्यासह डी. के. शिवकुमारही उपस्थित होते.

Chandrasekhar Swami
DK Shivakumar | मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मोठा दिलासा

मुख्यमंत्र्यांची रणनीती

स्वामींच्या विधानानंतर मंत्री राजण्णा तसेच काही आमदारांनी सिद्धरामय्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या. मात्र, त्यानंतर त्यांना सिद्धरामय्यांनी आपल्या निवासात बोलावून मुख्यमंत्री पदाविषयी कोणतेही जाहीर विधान करू नये, असे बजावले आहे. पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाईल. तेथून सूचना आल्यानंतर बदल व्हायचे ते होतील. तोपर्यंत कोणतीही विधाने करू नयेत. प्रसारमाध्यमांसमोर कोणतीही चर्चा केल्यास त्याचे वितरित परिणाम होणार हे निश्चित, असे त्यांनी मंत्री आणि आमदारांना सांगितले आहे.

श्रेष्ठींच्या निर्णयानंतरच बदल : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली असून, थेट पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले आहे. पक्षामध्ये होणारे कोणतेही बदल, कोणतेही मोठे निर्णय पक्षश्रेष्ठीच घेत असतात, असे त्यांनी सांगितले. चंद्रशेखर स्वामींनी सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचे आवाहन केल्यानंतर सोहळ्याला उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकित झाले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना घेरले. त्यावर सिद्धरामय्यांनी शांतपणे उत्तर दिले. ते म्हणाले, पक्षामध्ये कोणतेही बदल करायचे असतील, तर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतात. पक्षामध्ये होणार्‍या हालचाली त्यांच्या आदेशानुसार होतात. सत्तेचे हस्तांतर व इतर घडामोडी श्रेष्ठींच्या निर्देशानुसारच होतात. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याची सूचना मिळाली तर तसे करावेच लागेल. श्रेष्ठींकडून कोणताही आदेश मिळाल्यास त्यावर अमल करू.

Chandrasekhar Swami
भाजपचे डर्टी पॉलिटिक्स; कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची टीका

श्रेष्ठींसमोर मागणी मांडणे योग्य : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

एकीकडे स्वामी शिवकुमारांसाठी मुख्यमंत्रपदाची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही काँग्रेस नेते आणखी तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्मा करा, अशी मागणी करत आहेत. ती मागणी घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी दिल्लीला गेले आहेत. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रतिक्रिया देताना अतिरिक्त उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारला. काही नेत्यांनी याबाबत जाहीर विधाने केली आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर आपली मागणी मांडावी. प्रसारमाध्यमांसमोर बोलल्यास केवळ त्याचा प्रचार होता. कोणताही तोडगा निघत नाही. श्रेष्ठींसमोर मागणी मांडल्यास तोडगा निघत असल्याचे ते म्हणाले. तथापि, त्यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत काहीही वक्तव्य केले नाही.

स्वामी पद सोडतील काय? : मंत्री राजण्णा

स्वामींच्या सूचनेचा मंत्री के. एन. राजण्णा यांनी चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री असू दे, नाहीतर अन्य कोणी, पद सोडते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वामीजी आपले पद सोडायला तयार आहेत काय, मीच स्वामी होतो, असेच ते म्हणतील. आमचा हायकमांड असणारा पक्ष आहे. याबाबत हायकमांड निर्णय घेतील, असे मंत्री राजण्णा स्वामींच्या सूचनेसंदर्भात म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news