कोलंबो : वृत्तसंस्था आशिया चषकात सुपर-4 मध्ये रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या मोठ्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (एसीसी) एक मोठा निर्णय घेतला आहे. पावसाचा व्यत्यय पाहता या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पाऊस आल्यास हा सामना राखीव दिवशी अर्थात सोमवारी खेळवला जाईल.
याआधी साखळी फेरीत झालेल्या सामन्यात हे दोन्ही संघ भिडले होते. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णीत राहिला अन् दोन्हीही संघांना 1-1 गुण देण्यात आला. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरच्या सामन्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याच कारणामुळे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा म्हणजे सुपर-4 मधील सामना 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे; परंतु या सामन्यावरही मागील सामन्याप्रमाणे पावसाचे सावट आहे. त्यामुळे याबाबत यजमान पाकिस्तानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा सामना पावसामुळे वाया गेला, तर सुपर-4 सामन्यात एक राखीव दिवस जोडण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे 10 सप्टेंबरला सामना थांबल्यास 11 तारखेला तिथूनच सामना सुरू केला जाईल.
राखीव दिवस असणारा सुपर-4 फेरीतील हा एकमेव सामना आहे. राखीव दिवसाची आवश्यकता असल्यास प्रेक्षकांना त्यांची तिकिटे जपून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी सामना मूळ दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. राखीव दिवस सुरू झाल्यास, स्पर्धेचा कालावधी पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूइतकाच असेल.