कोल्हापूर : अनिल देशमुख रेशनवर दिल्या जाणार्या धान्यात ऑक्टोबर महिन्यासाठी कपात होणार आहे. राज्यात तब्बल 76 हजार 59 टन कमी धान्य उपलब्ध होणार आहे. यामुळे काही लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. रेशनवर मिळणार्या धान्यात या महिन्यात कपात होणार असल्याने प्रत्येक गावात वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत दरमहा प्रतिमाणसी 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ दिला जातो. काही जिल्ह्यात प्रतिमाणसी एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ दिला जातो. अंत्योदय योजनेंतर्गत प्रतिकार्ड 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र, ऑक्टोबर महिन्यात मिळणार्या धान्यात कपात होण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत काही जिल्ह्यांत वाटपानंतर धान्य शिल्लक राहिले आहे. हे धान्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय योजनेंतर्गत समायोजित करावे, अशा सूचना केंद्र शासनाने देत, नियमित धान्यात कपात करत असल्याचे पत्र राज्य शासनाला पाठवले आहे. या पत्रानुसार 30 हजार 69 टन तांदूळ व 45 हजार 972 टन गहू शिल्लक असून ऑक्टोबर महिन्यात वाटप होणार्या धान्यात त्याचा समावेश करून तो वितरित करावा, अशी सूचना केली आहे.
ऑनलाईनवर हे धान्य शिल्लक दिसत असले तरी ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी, तसेच कोरोना कालावधीत हे धान्य ऑफलाईन पद्धतीने वाटप झाले आहे. परिणामी, ऑनलाईन धान्य शिल्लक असले, तरी अनेक गोदामांत प्रत्यक्ष धान्य नाही अशी स्थिती आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यात कमी धान्य मिळेल अशीच शक्यता आहे. तांत्रिक अडचणीने हा धान्य तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात 76 हजार टन कमी धान्याचा पुरवठा होणार आहे. 'प्राधान्य कुटुंब' मध्ये 35 हजार 468 टन गहू, 23 हजार 200 टन तांदूळ, अंत्योदय योजनेत 10 हजार 504 टन गहू, तर 6 हजार 868 टन तांदूळ कमी देण्यात येणार आहे. उपलब्ध धान्यानुसारच दुकानदारांना वाटप करावे लागणार आहे. यामुळे काही ठिकाणी गहू आणि तांदूळ कमी प्रमाणात नागरिकांना दिला जाणार आहे.
राज्यातील स्थिती
ऑक्टोबर महिन्यात मागणीपेक्षा कमी धान्य पुरवठा होणार आहे. यामुळे ग्राहकांना देण्यात येणार्या धान्यात कपात करावी लागणार आहे. याबाबत राज्य शासनाला नियमित वाटपानुसार लागणार्या धान्याची मागणी कळवली आहे.
– मोहिनी चव्हाण,जिल्हा पुरवठा अधिकारी
कमी धान्यामुळे वाटपात कपात होणार आहे. यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. यातून काही गंभीर घटना उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? सरकारने नियमित धान्य उपलब्ध करून द्यावे.
– रवींद्र मोरे,
जिल्हाध्यक्ष, रेशन धान्य दुकानदार संघटना