Ratnagiri : राजापुरात रिफायनरीविरोधात एल्गार

राजापूर : मंगळवारी ना. आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यावेळी समर्थकांनी प्रकल्प व्हावा म्हणून घोषणाबाजी केल्याच्या दुसर्‍याच दिवशी राजापुरात रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधकांनी काढलेला मोर्चा.
राजापूर : मंगळवारी ना. आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यावेळी समर्थकांनी प्रकल्प व्हावा म्हणून घोषणाबाजी केल्याच्या दुसर्‍याच दिवशी राजापुरात रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधकांनी काढलेला मोर्चा.
Published on
Updated on

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : 'एकच जिद्द.. रिफायनरी रद्द'.. 'जमीन आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची'…'रिफायनरी हटाव… कोकण बचाव'… समुद्र वाचवा… कोकण वाचवा'….. अशा गगनभेदी घोषणा देत रिफायनरी विरोधकांनी राजापूर तहसील कार्यालयावर केंद्र शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढून आपला विरोध दर्शवला. त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्याचे निवेदन राजापूर तहसीलदार यांना सादर करण्यात आले.

केंद्र सरकारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला या अगोदर नाणार परिसरात विरोध करण्यात आला होता. त्यावेळी काही एन.जी.ओ. यांच्या माध्यामातून येथील स्थानिकांच्या मनात रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवण्यात आले होते. या विरोधामध्ये तत्कालीन सत्तेमध्येच असणार्‍या शिवसेनेने उडी घेत रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत युतीच्या शासनाला रिफायनरी प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्यास भाग पाडले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर युतीसाठी भाजपाने या प्रकल्पाचा बळी देत अधिसूचना रद्द केली होती. त्या नंतर रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्न काहीअंशी थांबला होता.

दरम्यानच्या काळात नाणार परिसरातील स्थानिक प्रकल्प समर्थक शेतकर्‍यांनी सुमारे साडेआठ हजार एकर
जमीन या रिफायनरी प्रकल्पासाठी देण्याची तयारी करत तशी संमतीपत्रे शासनाकडे सादर केली होती. तरीही विरोधात उतरलेल्या शिवसेनेने रिफायनरी विरोधाचा हेका कायम ठेवत नाणार जाणार म्हणजे जाणार, अशी घोषणा दिली होती. त्या नंतर या प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय झाले होते.

दरम्यानच्या काळात शिवसेनेने धोपेश्वर बारसू परिसरात मिनी औद्योगिक वसाहतीसाठी अधिसुचना जाहीर केली होती व त्यानंतर या परिसरात रिफायनरी प्रकल्प हलवण्याची तयारी सुरू केली. या धोपेश्वर बारसू परिसरातील जनतेने या प्रकल्पाला पाठिंबा देत समर्थन केले व तशी मागणी शासनाकडे एकमुखाने केली. दोन दिवसांपूर्वी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी रिफायनरी होण्याचे संकेत दिले होते.

आदित्य ठाकरे कोकण दौर्‍यावर असतानाच आज पुन्हा या रिफायनरी प्रकल्प विरोधाने डोके वर काढले आहे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात त्यावेळी शिवसेना अग्रेसर असल्यामुळे रिफायनरी विरोधक शिवसेनेचा उदो उदो करताना दिसत होते. मात्र, बारसू परिसरात शिवसेनाच या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे आजच्या मोर्च्यात शिवसेना विरोधी घोषणा देण्यात येत होत्या.त्यामध्ये लोकप्रतिनिधी यांनाही लक्ष करण्यात आले रिफायनरी विरोधात घोषणाबाजी सुरू होती.

ग्रामपंचायतींचे रिफायनरी विरोधात ग्रामसभांचे ठराव आझाद मैदानावरील आंदोलन होऊन देखील शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका त्या निवेदनात कऱण्यात आली आहे. आपला प्रकल्प विरोध हा शास्त्रीय आधारावर आहे.असे अनेक मुद्दे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहेत. मंगळवारी पर्यटनमंत्र्यांच्या दौर्‍यात रिफायनरी समर्थकांचे प्रदर्शन झाले होते तर बुधवारी तालुक्यात रिफायनरी विरोधात मोर्चा काढण्यात आल्याने कोकणात पुन्हा एकदा रिफायनरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

प्रकल्प लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू

राजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले बारसू सोलगाव -धोपेश्वर परिसरात प्रदूषणकारी प्रकल्प आणले जाऊ नयेत जर शासनाने तो लादण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो हाणून पाडू, असा इशारा तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनादवारे देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news