दुर्मीळ निळ्या हिऱ्याचा लिलाव; जगातील सर्वात महागड्या हिऱ्यांपैकी एक ठरला

दुर्मीळ निळ्या हिऱ्याचा लिलाव; जगातील सर्वात महागड्या हिऱ्यांपैकी एक ठरला

हाँगकाँग : अतिशय सुंदर अशा निळ्या हिर्‍याचा हाँगकाँगच्या सोथबी कंपनीच्या केंद्रात लिलाव झाला आहे. या हिर्‍याचे नाव आहे 'द डी बीयर्स कलिनन ब्लू डायमंड'. हा 15.10 कॅरेटचा हिरा लिलावात 39 दशलक्ष पौंडांना विकला गेला. भारतीय चलनात ही किंमत सुमारे 373 कोटी रुपये आहे. हा जगातील सर्वात महागड्या निळ्या हिर्‍यांपैकी एक ठरला आहे.

हिरे पारदर्शकच असतात असे नाही तर ते विविध रंगांचेही असतात. विशेषतः गुलाबी आणि निळ्या रंगाचे हिरे अतिशय आकर्षक व महागडे असतात. चक्क काळ्या रंगाचाही एक टपोरा हिरा प्रसिद्ध आहे. अशा दुर्मीळ हिर्‍यांना किंमतही मोठीच मिळत असते. तीनच महिन्यांपूर्वी या निळ्या रंगाच्या हिर्‍याचाही लिलाव झाला होता. त्याची किंमत 40.2 दशलक्ष डॉलर्स ठरवण्यात आली होती. हाँगकाँगमध्ये फाईन आर्टस् कंपनी 'सोथबी'ने आता या हिर्‍याचा लिलाव केला. हा दुर्मीळ हिरा 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील 'कलिनन माईन' नावाच्या खाणीत सापडला होता. रंगीत हिर्‍यांमध्ये त्याची रँकिंग अतिशय वरची आहे. पृथ्वीच्या पोटात अशा प्रकारचे हिरे बनण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतात. आतापर्यंतचा सर्वात महागडा निळा हिरा 'ओपेनहाइमर ब्लू' हा आहे. या 14.62 कॅरेटच्या हिर्‍याचा 2016 मध्ये 4 अब्ज, 40 कोटी, 42 लाख, 18 हजार 780 रुपयांना लिलाव झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news