माढ्यात निंबाळकरांना उमेदवारी अन् हादरा मोहिते-पाटलांना

माढ्यात निंबाळकरांना उमेदवारी अन् हादरा मोहिते-पाटलांना

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित माढा लोकसभा मतदार संघात अखेर विद्यमान खा. रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. यामुळे मोहिते-पाटील गटास मोठा हादरा मानला जात आहे. याठिकाणाहून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि भाजपचे विद्यमान आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या काही काळापासून मोहिते-पाटील गट मोठ्याप्रमाणावर प्रयत्नशील होता. परंतु आज जाहीर झालेल्या भाजपच्या उमेदवार यादीत पुन्हा एकदा विद्यमान खा. नाईक-निंबाळकर यांनाच संधी दिल्याने मोहिते-पाटील गटाच्या सर्व प्रयत्नांना सुरुंग लागला आहे.

गत लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे आपल्या पूर्ण ताकदीनिशी भाजपवासी झाले. त्याचा पक्षप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये झाला होता. मोहिते-पाटील गटास मानणारा मोठा वर्ग यानिमित्ताने भाजपशी जोडला गेला. त्यावेळी फलटणच्या नाईक-निंबाळकरांना विजयी करण्यात मोहिते-पाटील गटाने मोलाची भूमिका बजावली होती. परंतु गेल्या काही काळापासून खा. नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यातच खा. नाईक-निंबाळकर यांनी मोहिते-पाटील घराण्याच्या राजकीय शत्रूंशी घरोबा केला. यामुळे मोहिते-पाटील अधिकच दुखावले. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकी कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातीलच उमेदवार उभा करण्याचा चंग बांधला. त्यानुसार धैर्यशील मोहिते-पाटील यांना संभव्य उमेदवार म्हणून प्रमोट केले होते. तसेच स्वतः धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही अनेक कार्यक्रमांमध्ये सुस्पष्टपणे सांगितले होती की आपण स्वतः लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्यादृष्टीने मोहिते-पाटील घराण्याने विद्यमान खा. नाईक-निंबाळकर घराण्याचे कट्टर शत्रू फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्याशीही बातचीत सुरू केली होती. सोशल मीडियावर मोहिते-पाटील गटाकडून मोहिते-पाटील यांचे मोठ्याप्रमाणावर ब्रॅण्डिंगही करण्यात आले होते. परंतु आता त्यांना उमेदवारीच न मिळाल्याने आगामी काळात मोहिते-पाटील गटाची नेमकी काय भूमिका राहाणार याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.

मोहिते-पाटील गट खा. निंबाळकरांसाठी काम करणार का?

भाजपचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मागील काही काळापासून मोहिते-पाटील घराण्याच्या राजकीय शत्रूंशी जवळीक केली. इतकेच काय कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेच्या मोहिते-पाटील घराण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे राजकीय क्रेडिट घेण्याचाही प्रयत्न केला आहे. यामुळे मोहिते-पाटील गट विरुद्ध खा. नाईक-निंबाळकर यांच्या दीर्घकाळापासून राजकीय शीतयुद्ध जिल्ह्याने पाहिले आहे. आता अशा परिस्थिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा खा. नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांचे काम मोहिते-पाटील गट करणार का याबाबत नागरिकांत उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news