नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामांकन अर्ज पडताळणीत बाद ठरविला आहे. त्यामुळे आता त्यांचे पती श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यांचा अर्ज काँग्रेसने पर्यायी म्हणून आधीच भरून ठेवलेला होता. आज रात्री उशिरा या संदर्भात रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला निकाल दिला. आज सकाळी सामाजिक न्याय विभागाच्या जात पडताळणी समितीने काँग्रेस उमेदवार यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरविले. यानंतर बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आजच सुनावणीची मागणी केली.मात्र, उच्च न्यायालयाने ती नाकारत सोमवारी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यामुळे आज नामांकन अर्ज पडताळणीत काय होणार ,याविषयीची उत्सुकता असल्याने माजी मंत्री सुनील केदार,रश्मी बर्वे समर्थक मोठ्या संख्येने परिसरात उपस्थित होते. एसडीओ यांनी दिलेले जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्याने त्या या रामटेक राखिव मतदारसंघात निवडणूक लढण्यास अपात्र ठरतात, याच कारणामुळे त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला. श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज पडताळणीत वैध ठरल्याने ते आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असतील अशी माहिती यासंदर्भात विरोधी पक्षाचे वकील एडवोकेट मोहित खजांची यांनी "पुढारी'शी बोलताना दिली दिली.