मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी का तडजोड केली, याचे गुपित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी उघड केले. हा पारंपरिक मतदारसंघ सोडण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेची एक जागा देण्याचे भाजपने मान्य केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा सोमवारी प्रसिद्ध केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी सातारा मतदारसंघाच्या बदल्यात एक राज्यसभेची जागा मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलेली सातार्याची जागा उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपला सोडण्यात आली. त्या बदल्यात राज्यसभेची एक जागा मिळवून राष्ट्रवादीने हे नुकसान भरून काढण्याची खेळी केली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ते ही जागा जिंकण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे पटेल म्हणाले.
महायुतीत नाशिकच्या जागेचा पेच अजूनही सुटलेला नाही. राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा केला होता. मात्र,राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार छगन भुजबळ यांनीच निवडणुकीतून माघार जाहीर केल्याने राष्ट्रवादीने नशिकवरील दावा सोडल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पटेल यांनी नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा अजूनही कायम असल्याचे सांगितले.