बजाज यांचे मूळ गाव राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील 'काशी का बास' हे. राहुल बजाज यांचे पैतृक निवासस्थान आजही या गावात आहे. बजाज कुटुंबातील काही लोक अजूनही गावात आहेत. 2011 मध्ये राहुल बजाज (rahul bajaj) सिकरला, 'काशी का बास'ला आले, तेव्हा स्वत:चा परिचय करून देताना, तुम्ही सारे जमनालाल बजाज यांना ओळखता. मी त्यांचा नातू आहे. एवढेच म्हणाले होते.
जमनालाल बजाज हे या गावातील एका गरीब कुटुंबात जन्माला आले होते. ते चौथीपर्यंत शिकले होते. वर्धा येथील बछराज शेट यांनी त्यांना दत्तक घेतले. जमनालाल यांना दत्तक देण्याच्या मोबदल्यात गावासाठी विहीर बांधून देण्याची अट त्यांच्या जन्मदात्यांनी घातली होती. बछराज शेट यांनी ती पाळली. आजही ही विहीर या गावात आहे. जमनालाल बजाज यांनी व्यवसायात पुढे नवनवे उच्चांक कायम केले.
राहुल बजाज (rahul bajaj) यांनी ही परंपरा कायम ठेवली आणि आज बजाज समूह 1 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेला समूह म्हणून दिमाखाने उभा आहे. गांधीजी जमनालाल बजाज यांना आपला पाचवा मुलगा मानत. राहुल बजाज यांच्यावरही जमनालाल यांच्या विचारसरणीचा प्रभाव अखेरपर्यंत राहिला.
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये समूहाची धुरा सांभाळल्यानंतर 80 च्या दशकात 'टू व्हिलर' उत्पादनाच्या क्षेत्रात बजाज ही सर्वांत मोठी कंपनी बनली होती. राहुल बजाज यांनी 'हमारा बजाज' म्हणत बजाज स्कुटर दारादारात पोहोचविली. त्यांचे पुत्र राजीव यांनी बजाज बाईक्सना नवे आयाम दिले.