Pudhari Editorial : कूटनीती भारताची, हतबल पाकिस्तान

Pudhari Editorial : कूटनीती भारताची, हतबल पाकिस्तान
Published on
Updated on

Pudhari Editorial : 2021 च्या ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवला आणि आपली सत्ता स्थापन केली. तेथून अमेरिकेची वापसी झाल्यानंतर आणि तालिबानने देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पाकिस्तानला मोठे जग जिंकल्याचा आभास झाला. तालिबानच्या जीवावर आपले स्थान बळकट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारत कूटनीतीने हाणून पाडत आहे.

भारताची फूड डिप्लोमसी ही काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. या जोरावर तालिबान हा भारताशी मैत्री करण्यास तयार आहे. अशावेळी पाकिस्तानला या स्थितीकडे बघण्याशिवाय काहीच हातात नाही. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यानंतर पाकिस्तानचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी आता भारताने इराणचा मार्ग निवडला आहे. अफगाणिस्तानपासून भारत जेवढा दूर जाईल, तेवढा पाकिस्तान मजबूत होईल आणि ही बाब भारताला चांगलीच ठाऊक आहे. अफगाणिस्तानच्या पडत्या काळात भारताने धान्यपुरवठा करत मैत्री आणि शेजारधर्म पाळण्याचा प्रयत्न केला. यातही पाकिस्तानने अडथळे आणले. Pudhari Editorial

शेवटी भारताने इराणचा पर्याय निवडला. इराणमार्गे मदत पोहोचवण्यासाठी भारत प्रयत्नशील असून, अफगाणिस्तानातील आपले स्थान बळकट करत आहे. यावेळी मात्र अफगाणिस्तानला मदत करताना भारताने पाकिस्तानला महत्त्व दिले नाही. नव्याने आखलेल्या कूटनीतीनुसार भारताने आपले धान्य इराणमार्गे अफगाणिस्तानच्या हेरत भागात पाठवले. यापूर्वी भारताने पाकिस्तानच्या मार्गाने अफगाणिस्तानला गहू पाठविला असता तपासणीच्या नावाखाली अनेक दिवस ट्रक अडवून ठेवले. पाकिस्तान स्वत: मदत करू शकत नसला, तरी दुसर्‍याच्या मदतीत खोडा घालण्याचे काम केले आहे. आजघडीला अफगाणिस्तानात 1.9 कोटीपेक्षा अधिक नागरिक पुरेशा अन्नाची वाट पाहत आहेत. देशात भूकबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pudhari Editorial : तालिबानच्या सरकारला पाकिस्तानकडे झुकण्यास रोखायचे असेल, तर त्यांच्या वाईट काळात मदत करायला हवी आणि ही बाब भारताला ठाऊक आहे. अर्थात, भारताने आतापर्यंत तालिबानच्या सरकारबाबत कोणतेही स्पष्ट मत मांडलेले नाही. मात्र, तेथील नागरिकांसाठी भारताने आपला साठा खुला केला आहे. अफगाणिस्तानात भारताने आतापर्यंत कोट्यवधींची गुंतवणूक केली असून, ती जर वाचवायची असेल, तर मदतीची डिप्लोमसी अंगीकारावी लागेल. भारताने सातत्याने मदतीचा हात पुढे केला असून, ते पाहून तालिबानदेखील दोन पावले पुढे आला आहे. तालिबानचा प्रवक्ता शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजईने आम्हाला भारतासमवेत मैत्री करायची असल्याचे म्हटले आहे. तालिबानच्या आग्रहाखातर काही दिवसांपूर्वी दोहा येथे भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी स्टेनकजई यांची भेट घेतली. भारताने म्हटले की, आमचे तालिबानशी काही वैर नाही. परंतु, संबंध कसे ठेवायचे, हे तालिबानच्या निर्णयावर अवलंबून असेल.

भारताने गेल्या वीस वर्षांत अफगाणिस्तानात विकासकामांशी संबंधित अनेक कामे केली आहेत. अशावेळी तालिबानलादेखील भारताशी चांगले संबंध ठेवावे लागणार आहेत. तालिबान हा दीर्घकाळापासून भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर 2019 मध्ये तालिबानने काश्मीरसंंदर्भात निवेदन जारी केले. काश्मीर हे भारताचे अंतर्गत प्रकरण असल्याचे तालिबानने म्हटले होते. या बाबतीत आपण पाकिस्तानला पाठिंबा देणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केले होते. Pudhari Editorial

अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर तालिबानने भारताशी सतत चर्चा करण्याबाबत सकारात्मक रणनीती आखली आहे. वास्तविक तालिबानकडून अधिकाधिक देशांशी संपर्क करण्याचा आणि संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आशिया खंडात टिकून राहायचे असेल, तर भारताच्या बरोबरीने वाटचाल करावी लागेल, हे तालिबानला ठाऊक आहे. भारताशी वैर ठेवण्याचे दुष्परिणाम पाकिस्तान भोगत आहे आणि ही बाब तालिबानदेखील पाहत आहे. तालिबानच्या हतबलतेचा फायदा भारत घेत असून, पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या रणनीतीवर काम सुरू आहे. सध्या पाकिस्तानची अवस्था खूपच वाईट आहे. महागाईने कहर केल्याने तेथील जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. पाकिस्तान स्वतःचेच घर सांभाळू शकत नाही, तर तो अन्य देशांना काय मदत करणार. त्यामुळे भारताशी जवळीक तालिबानला खूपच उपयुक्त आहे. तालिबान अफगाणिस्तानात आल्यानंतरही तेथील परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी भारताशी सौहार्दाचे संबंध स्थापित करणे हे तालिबानसाठी फायदेशीर आहे. Pudhari Editorial

– मिलिंद सोलापूरकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news