नितीशकुमारांचे ‘उत्तरायण’

नितीश कुमार
नितीश कुमार

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुरू असलेल्या विरोधकांच्या मोटबांधणीत नितीशकुमार आघाडीवर दिसत आहेत. सर्व विरोधी पक्षांना एकत्रित बांधण्याबरोबरच नितीशकुमारांबाबत एक नवा प्रयोग केला जाणार आहे. नितीशकुमार हे कुर्मी समाजातील मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविली तर त्यांच्या चेहर्‍यावर कुर्मी समाज एकवटला जाईल आणि तो आपल्या बाजूने झुकला जाईल, असे विरोधकांच्या रणनीतीकारांना वाटते.

2024 ची लोकसभा निवडणूक पाहता राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध विरोधकांची मोर्चेबांधणी केली जात असताना आणखी एक प्रयत्न विरोधकांच्या आघाडीकडून किंबहुना जेडीयूकडून केला जात आहे. ती म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना उत्तर प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे. यासाठी कुर्मीबहुल फुलपूर मतदारसंघ निश्चित केला आहे. या मतदारसंघातून आतापर्यंत कुर्मी नेत्यांनी विजय संपादन केलेला आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे मातब्बर नेत्यांनी राजकीय भवितव्य फुलपूरमधून आजमावले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून कांशीराम आणि व्ही. पी. सिंग यांच्यापर्यंतचे नेते या मतदारसंघातून लढले आहेत. फुलपूरमधून नितीशकुमार यांना का उमेदवारी द्यावी, यासाठी दावे केले जात आहेत. त्यात म्हटले की, 2014 रोजी नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. पण त्यांना उत्तर प्रदेशातील कामगिरीबाबत हमी नव्हती. लोकसभेतील 80 जागा उत्तर प्रदेशातील आहेत. 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 403 जागांपैकी भाजपला 47 जागा मिळाल्या आणि तिसर्‍या स्थानावर राहिली.

मोदी यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देताना भाजपच्या रणनीतीकारांना एकच भीती होती की, उत्तर प्रदेशचा ट्रेंड बदलला नाही तर मोदी यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर आणण्यास काही फायदा मिळणार नाही. ट्रेंड बदलणार की नाही या शंकेपोटी भाजपने मोदी यांना गुजरातबरोबरच उत्तर प्रदेशातूनही उभे केले. ते उत्तर प्रदेशात उभे राहिल्याने त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर झाला आणि दिसलादेखील. 80 पैकी 73 जागा भाजपच्या पारड्यात गेल्या. परिणामी एनडीएला 300 चा आकडा पार करण्यासाठी कोणताही त्रास झाला नाही. एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या.

या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो, की नितीशकुमार हे मोदी यांच्याप्रमाणे चमत्कार करण्याची किमया करतील? किंवा त्यांच्यात तितकी क्षमता आहे का? या आशेपोटी त्यांना उत्तर प्रदेशात आणण्याचा आटापिटा केला जात आहे. त्यांना उत्तर प्रदेशात आणण्याचा प्रयत्न पाहिल्यास त्यामागे जातीय समीकरणात व्यापक बदल करण्याचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. उत्तर प्रदेशातील सर्व पक्षीय नेते कुर्मी समाजाला बाजूला आणण्याचे आणि त्यांच्या नेत्यांना पुढच्या रांगेत उभे करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मुलायमसिंह यादव यांच्यावेळी समाजवादी पक्षाचे बेनी प्रसाद वर्मा हे दुसर्‍या क्रमांकाचे नेते होते. अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात नरेश उत्तम पटेल हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. कांशीराम हेदेखील उत्तर प्रदेशात जंग बहादूर पटेल, सोनेलाल पटेल, रामलखन वर्मा यांसारख्या कुर्मी नेत्यांच्या माध्यमातून बहुजन समाज पक्ष त्यांच्यापर्यंत नेण्यात यशस्वी ठरले.

यानुसार मायावती उत्तर प्रदेशात चार वेळेस मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजपनेही ओमप्रकाश सिंह, विनय कटियार आणि स्वतंत्रदेव सिंह यांना प्रदेशाध्यक्ष करत कुर्मी कार्ड खेळले.
हिंदी पट्ट्यात नितीशकुमार हे कुर्मी समाजातील मोठे नेते आहेत आणि यात कोणाचेही दुमत नाही. विरोधकांच्या रणनीतीकारांना वाटते की, नितीशकुमार यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविली तर त्यांच्या चेहर्‍यावर कुर्मी समाज एकवटला जाईल आणि तो आपल्या बाजूने झुकला जाईल. साहजिकच या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशातील निडणूक गणितावर परिणाम होईल. त्यामुळे नितीशकुमार हे उत्तर प्रदेशातून आपल्याच चिन्हावर लढतील यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहे. तसेच विरोधकांच्या आघाडीत असलेल्या सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध विरोधकांची आघाडी उभारली जात असताना स्वत: नितीशकुमार उत्तर प्रदेशातून लढण्यास तयार आहेत की नाही, हे पाहावे लागेल. हा निर्णय त्यांना स्वत:च घ्यावा लागणार आहे.

– संगीता चौधरी, पाटणा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news