नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील माढा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यात विजयसिह मोहिते पाटील यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. माढ्याच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचे मोठे प्रस्थ आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड माढा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, प्रवीण गायकवाड यांनी रविवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत माढ्याच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. त्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीची समिकरणे वेगळी बघायला मिळु शकतात.
गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. भाजपने या ठिकाणी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आता प्रवीण गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. प्रवीण गायकवाड हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. या पार्श्वभुमीवर माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवार काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रवीण गायकवाड यांनी दिल्ली दौऱ्यासंदर्भात 'पुढारी'शी बोलताना सांगितले की, "धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर ते नक्कीच निवडून येतील. सध्याच्या परिस्थीतीत तुतारीसाठी चांगले वातावरण आहे. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर निवडणुक लढवली नाही तर मी स्वतः माढ्यातून लढण्यास सज्ज असल्याचे शरद पवारांना सांगितले आहे. माझे शिक्षण माढा परिसरात झाले आहे, तिथेच माझी शेती आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक चळवळीच्या निमित्ताने सातत्याने या परिसरात आहे. त्यामुळे माढा माझ्यासाठी किंवा मी माढ्यासाठी नवा नाही, असेही प्रवीण गायकवाड म्हणाले.
हेही वाचा