पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंगच्या परीक्षा आता मराठीतूनही देता येणार

पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंगच्या परीक्षा आता मराठीतूनही देता येणार
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंगमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीबरोबरच मराठी भाषेतही परीक्षेचा पेपर लिहिता येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी विधान परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर करण्यात आले.

पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बरोबरच मराठीतही परीक्षेचे पेपर लिहिता यावेत, यासाठी विधानसभेने मंजूर केलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक गुरुवारी विधान परिषदेत सादर करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडले.

या सुधारित विधेयकामुळे या विद्यापीठात अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहे. विधेयकाचा हेतू स्पष्ट करताना मंत्री पाटील म्हणाले, 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले. या धोरणात मातृभाषेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंग या दोन्ही वर्गांची सर्व पुस्तके मराठीतून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कायद्यामध्ये केवळ इंग्रजीचाच समावेश आहे.

त्याऐवजी विधेयकात आता इंग्रजी व मराठी असा बदल केला आहे. तसेच सहा प्रश्नपत्रिकेपैकी चार मराठीत व दोन इंग्रजीमध्ये लिहिले तरी चालेल. पण हे ऐच्छिक असणार असून, त्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदवी चार वर्षांची केली जाणार असून ती पूर्ण करण्यासाठीचा कालावधी ऐच्छिक असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या कार्यालयातही मराठीचा आग्रह धरा! – दानवे

विधेयकाचे स्वागत करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मराठी भाषेचा जास्तीत जास्त ठिकाणी वापर केला पाहिजे. पण मराठीचा वापर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता इतर विद्यापीठांतही त्याचा उपयोग झाला पाहिजे. तामिळनाडू, केरळ या राज्यात केंद्रांच्या कार्यालयात त्यांची भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आपल्याकडेही केंद्र शासनाच्या कार्यालयातही अशा भाषा वापरण्यासाठी सरकारने आग्रह धरला पाहिजे, असेही दानवे म्हणाले. या विधेयकावर झालेल्या चर्चेत काँग्रेसचे अभिजीत वंजारी व जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

विद्यापीठांना देणार सॉफ्टवेअर

केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार मराठीतून शिक्षण देण्यासाठी मुंबईच्या आयआयटीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केले असून, हे सॉफ्टवेअर सर्व विद्यापीठांना देण्यात येणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअरमुळे शिक्षकांनी कोणत्याही भाषेतून शिकवले तरी विद्यार्थ्यांला मातृभाषेत समजेल, असे हे सॉफ्टवेअर असल्याचे त्यांनी सांगितले. या सॉफ्टवेअरचा अत्यंत चांगला उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news