पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने मुलायमसिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा असा केला होता. तेच लोक त्यांना पद्म विभूषण पुरस्कार देतायेत हे अयोग्य आहे, असे मत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२८) व्यक्त केले. अयोध्यामध्ये
कारसेवकांवर गोळीबार केल्यामुळे आम्ही कायमच मुलायमसिंहाना विरोध केला आहे; मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे भाजप बाळासाहेब, सावरकरांना विसरून अशांना का पुरस्कार देत आहे, सावरकरांना कधी भारतरत्न देणार आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्वतः भाजपने मुलायमसिंह यांचा उल्लेख वारंवार हत्यारा असा केला होता. आता त्यांना पद्म पुरस्कार देऊन गौरवणारे भाजप कुठे तरी बदलत आहे. मुलायमसिह यादव यांच्या कुटुंबीयांनी किंवा कार्यकर्त्यांनी पुरस्कारची मागणी केली नव्हती. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातूनच भाजप भूमिका घेत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुलायमसिंह यादव हे देशाचे मोठे नेते आहेत, त्यांचे राजकीय नेतृत्वात आणि समाजवादी चळवळीमध्ये मोठे कार्य आहे. असे सांगताना राऊत यांनी त्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवण्याचा दिलेला आदेश कधीही विसरला जाऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा :