दिल्ली वार्तापत्र : भाजपला रोखण्यासाठी विरोधकांचा चंग!

दिल्ली वार्तापत्र : भाजपला रोखण्यासाठी विरोधकांचा चंग!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा विविध कारणांमुळे गाजत आहे. गांधी यांची दौर्‍यादरम्यानची भाषणे सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहेत. भाजपवाले तिरस्काराचे आणि समाजात फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोप गांधी यांनी जवळपास प्रत्येक भाषणात केला. भाजपच्या तिरस्काराला उत्तर देण्यासाठीच आपण 'मोहब्बत की दुकान' अर्थात प्रेमाचे दुकान सुरू केले असल्याची टिपणीही ते करीत आहेत.

राहुल गांधी जेव्हा जेव्हा विदेशात जातात, तेव्हा ते भारताची बदनामी करतात, असे सांगत भाजपने आधी या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतली खरी; पण आता गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' ला 'नफरत का मेगा शॉपिंग मॉल' या प्रतिवाक्याद्वारे प्रत्युत्तर देण्याचे धोरण भाजपने अंगीकारले आहे. लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यानच्या शाब्दिक चकमकींमध्ये वाढ होण्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. निवडणुकांच्या राजकारणात मागील काही काळापासून अपयश सहन कराव्या लागत असलेल्या राहुल गांधी यांचा हिमाचल आणि कर्नाटकमधील विजयानंतर उत्साह दुणावला आहे. त्यांचे सारे लक्ष आता 2024 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे लागले आहे. काही सत्ताधारी नेत्यांकडून आजही गांधी यांचा 'पप्पू' या नावाने उपहास केला जातो. मात्र, कर्नाटकच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांना हलक्यात घेण्याची चूक भाजप करणार नाही. भाजपचे दिग्गज नेते आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, हे याचे सूचक म्हणावे लागेल. बहुतांश जागांवर एक उमेदवार देण्याची विरोधी आघाडीची नीती यशस्वी ठरली, तर भाजपला विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागेल.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकींपूर्वी विरोधी पक्ष एकत्र आले नव्हते, असे नाही; पण त्या एकतेमध्ये कुठेही सूत्रबद्धता नव्हती किंवा जीवही नव्हता. यावेळी ती कसर भरून काढण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच आघाडी बनू शकते, हे तृणमूल आणि आम आदमी पार्टीसारख्या पक्षांना पटवून देण्याचा प्रयत्न संयुक्त जदचे नेते नितीशकुमार करीत आहेत. पाटणा येथील 23 जून रोजीची बैठक सफल झाली, तर तृणमूल आणि 'आप' ला विरोधी आघाडीत सामील करून घेण्याचा कुमार यांचा प्रयत्न मार्गी लागू शकतो. एकसंध अशी विरोधी आघाडी बनली, तर तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेचा मुद्दा आपोआप बाजूला पडेल आणि भाजप विरुद्ध काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी अशी थेट लढत लोकसभेच्या निवडणुकीत पाहवयास मिळेल. एकीकडे केंद्रातील मोदी सरकारने दहाव्या वर्षात पदार्पण केलेले असताना दुसरीकडे विखुरलेले विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येऊ पाहत आहेत. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत भाजपला उलटे अस्मान दाखवयाचे, असा चंग विरोधी पक्षांनी बांधला आहे. यासाठी पाटणा येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी हे हजर राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

'भारत जोडो' यात्रा यशस्वी झाल्यापासून राहुल गांधी यांचे नव्या अवतारात राजकीय पटलावर आगमन झाले आहे. त्यामुळेच भाजपच्या धुरिणांना निवडणुकीसाठीच्या आखाड्यात फेरबदल करावे लागत आहेत. हे बदल नेमके कशा स्वरूपाचे असणार, हे आगामी काळात दिसून येणारच आहे. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार की नाही, हा विरोधी पक्षांच्या बाबतीत गौण मुद्दा ठरत चालला आहे. तूर्तास भाजपला सत्तेतून बाहेर काढणे, हेच विरोधी पक्षांचे अंतिम लक्ष्य आहे. विरोधी आघाडीला शह देण्यासाठी भाजपला राज्या-राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची गरज भासू लागली आहे. बिहारमध्ये अनेक छोट्या पक्षांना भाजपने गळास लावले आहे, तर पंजाब, आंध—मध्ये क्रमशः अकाली दल आणि तेलगू देसम पार्टी यांना भाजपसोबत घेऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीचा विचार केला, तर अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत अपेक्षित आहे. या राज्यांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा, आसाम, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस मुसंडी मारू शकते, त्यात केरळ, तेलंगणा, पंजाब, तामिळनाडू यांचा समावेश आहे. 2014 नंतर काँग्रेसची पहिली व दुसरी फळी अस्ताव्यस्त झाली होती. ती फळी मजबूत करण्याचे काम अध्यक्ष खर्गे करीत आहेत. कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील मतभेद सांधण्यात यश आले, त्याप्रमाणे इतर राज्यांतही नेत्या-नेत्यांमधील मतभेद दूर केले जात आहेत. याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात पक्षाला मिळणार आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांपेक्षा 2024 ची लोकसभा निवडणूक वेगळी ठरणार आहे. राहुल गांधी यांना पप्पू संबोधून अथवा जोरजोरात पंचतारांकित प्रचार यंत्रणा राबवून निवडणूक जिंकणे हे भाजपसाठी दिवास्वप्न ठरेल. महागाई, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांबरोबरच काही मोफतच्या योजनांची आश्वासने देऊन कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपला लोळवले होते. ज्येष्ठ नेत्यांना डावलले गेल्याने जातीय समीकरणेदेखील भाजपच्या कामी आली नव्हती. या सार्‍या बाबींचा विचार भाजपला लोकसभा निवडणुकीत करावा लागणार आहे. राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान'ला केवळ 'नफरत का शॉपिंग मॉल' असे प्रत्युत्तर देऊन निवडणूक जिंकणे भाजपला शक्य होणार नाही.

हरियाणात वाढत चालली भाजपची डोकेदुखी

भारतीय कुस्तीपटू संघटनेचे माजी अध्यक्ष बृ्रजभूषण सिंग यांच्याविरोधातील आंदोलनामुळे हरियाणाचे राजकारण ढवळून निघालेले असतानाच आता दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टीने (जेजेपी) भाजपवर डोळे वटारण्यास सुरुवात केली आहे. आणखी सव्वा वर्षाने हरियाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वीच राज्यात नवीन राजकीय समीकरणांची नांदी होईल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौताला यांनी आघाडी सरकारमधून काढता पाय घेतलाच, तर काही अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार तगवायची धडपड भाजपने सुरू केली आहे. जेजेपीने भाजपला समर्थन देऊन काही उपकार केलेले नाहीत, असे उद्गार भाजपचे हरियाणा प्रभारी बिप्लब देव यांनी काढले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून सारवासारव केली जात असली, तरी जेजेपी कडून भाजपला कोणत्याही क्षणी दणका दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

– श्रीराम जोशी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news