स्त्रीधनावर फक्त विवाहित स्त्रीचाच अधिकार!; गैरवापर केल्यास पुरुषावर चालू शकतो खटला

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

मुंबई : पुढारी डेस्क ;  स्त्रीधन ही जोडप्याची संयुक्त मालमत्ता होऊ शकत नाही. विवाहित महिलेच्या संपत्तीवर (स्त्रीधन) पतीचा अधिकार नाही. या संपत्तीचा वापर पती संकटकाळात करू शकत असला तरी नंतर त्याने ती पत्नीला परत करणे आवश्यक आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका कौटुंबिक खटल्यात दिला आहे. न्या. संजीव खन्ना व न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने या संदर्भातील खटला निकाली काढताना दिलेल्या या निकालाने स्त्रीधनवरील विवाहित महिलांच्या अधिकाराला बळकटी मिळणार आहे.

स्त्रीधनावरील वैवाहिक वादाचा निकाल देताना न्या. खन्ना व न्या. दत्त यांच्या खंडपीठाने सांगितले की, स्त्रीला तिच्या स्त्रीधनावर पूर्ण अधिकार आहे. या मालमत्तेची स्वतःच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावण्याचा अधिकारही तिचा आहे. तिच्या स्त्रीधनावर पतीचे नियंत्रण नसते. तो संकटकाळात त्याचा वापर करू शकतो. परंतु नंतर ती मालमत्ता किंवा त्याच्या मूल्याइतकी संपत्ती पत्नीला परत करणे, ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे स्त्रीधन मालमत्ता ही पती-पत्नीची संयुक्त मालमत्ता बनत नाही आणि पतीला या मालमत्तेवर मालकी दाखवता येणार नाही.

स्त्रीधनाचा गैरवापर केल्यास संबंधित व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर विश्वासभंग केल्याप्रकरणी भादंविच्या कलम 406 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात एका महिलेने पतीशी दुराव्यानंतर आपली मालमत्ता परत मिळवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. याच दरम्यान ते वेगळे झाले. यावेळी तिने लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिचे दागिने पतीने हिसकावल्याचा आरोप केला होता. 2009 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देत पतीला तिला 8.9 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. पुढे पती केरळ उच्च न्यायालयात गेला. तेथे न्यायालयाने महिला तचे स्त्रीधन काढून घेतल्याचे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट करीत कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला होता.

यानंतर महिलेने सर्वोच्च न्यायालयात नाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने पुरावे तपासून कौटुंबिक न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत तिला 25 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश पतीला दिले. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयाने उशिराने न्यायालयात आल्याबद्दल तिच्या प्रामाणिकपणावर संशय व्यक्त केला होता, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.

स्त्रीला लग्नाआधी, लग्नात किंवा त्यानंतर पालक, सासू-सासरे, नातेवाईक किंवा मित्रांकडून मिळालेला पैसा, दागिने, जमीन, भांडी किंवा अन्य भेटवस्तू या स्त्रीधनावर फक्त तिचाच अधिकार असतो, असेही यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news