आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत. हे पाचही मतदारसंघ विदर्भातील आहेत आणि महाविकास आघाडीद्वारे सर्व पाचही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचेच उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात विविध पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार दौरे करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी १३ एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. पूर्व विदर्भातील टोकावर असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासाठी राहुल गांधींना विशेष निमंत्रण दिल्याचे समजते. या प्रचारसभेवेळी भंडारा गोंदियाचे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, गडचिरोलीचे उमेदवार नामदेव किरसान, रामटेकचे उमेदवार श्याम कुमार बर्वे येथील उपस्थित राहणार आहेत.