मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : मतदाना दिवशी म्हणजे, ७ मे २०२४ रोजी आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील सद्गुरु श्री. बाळूमामा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशा आशयाचे पत्र आजारा भुदरगडच्या उपविभागीय अधिकारी, तथा ४७ कोल्हापूर लोकसभा, २७२ राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी बाळूमामा देवालयाच्या प्रशासकांना पाठवले आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून सदर दिवशी म्हणजे, मंगळवारी अमावस्या आहे. सद्गुरु बाळूमामाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असणार आहेत. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मतदाना दिवशी पोलीस कर्मचारीही मतदान केंद्रावर व इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत.
त्यामुळे परिस्थिती विचारात घेता मंगळवारी दिनांक ७ मे २०२४ रोजी एक दिवसा करता सद्गुरु श्री. बाळूमामा मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी बंद ठेवणे योग्य होणार आहे. या निर्णयाची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.
अमावस्या दिवशी आदमापूर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी अनेक राज्यातून भाविक येत असतात. लोकसभा निवडणुकीचे मतदान त्याच दिवशी असल्याने या दिवशी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. आठ तारखेपासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल याची भाविकांनी नोंद घ्यावी असे मंदिर प्रशासनाने कळवले आहे.