आरोग्य : वाढता लठ्ठपणा चिंताजनक…

लठ्ठपणा
लठ्ठपणा
Published on
Updated on

'येत्या काळात भारत लठ्ठपणा आणि त्यामुळे होणार्‍या विविध आजारांनी ग्रासलेल्या लोकसंख्येचा देश होण्याची भीती आहे. लठ्ठपणा किंवा स्थूलपणा हा कधीही एकटा येत नाही. तो सोबत मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारख्या व्याधींना घेऊन येतो. आज भारत ही मधुमेहाची राजधानी बनली आहे. उद्याचे भविष्य आनंददायी होण्यासाठी आजच लठ्ठपणाबाबत जागे होण्याची वेळ आली आहे.

लॅन्सेट हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मान्यताप्राप्त वैद्यकीय नियतकालिक मानले जाते. जगभरातील आरोग्य समस्या, आरोग्य स्थिती, नवीन संशोधन याविषयी नियतकालिकाने सादर केलेले अहवाल हे महत्त्वाचे मानले जातात. अलीकडेच लॅन्सेटने एक अहवाल प्रकाशित केला जात असून त्यामध्ये जगभरात वाढत चाललेल्या लठ्ठपणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील एकूण लठ्ठ व्यक्तींची संख्या या नियतकालिकाच्या आकडेवारीवरून समोर आली असून त्यानुसार जगभरात मुले व प्रौढांमध्ये 1990 च्या तुलनेत 2022 मध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जवळजवळ चौपट झाल्याचे दिसून आले आहे. आपल्यासाठी चिंतेची बाब म्हणजे भारतातही स्थूलपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे.

देशभरात 2022 मध्ये 5 ते 19 वयोगटातील सव्वा कोटी मुले लठ्ठ असल्याचे आढळून आले. त्यात 73 लाख मुले आणि 52 लाख मुलींचा समावेश होता. लठ्ठपणा असलेल्या मुलांच्या संख्येत 1990 पासून 2022 पर्यंत 40 लाखांनी वाढ झाली आहे. मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 3 टक्के आढळून आले. प्रौढांमध्येही लठ्ठपणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. विशेषत: महिलांमध्ये हे प्रमाण वाढत असून, ते 9.8 टक्के आहे. तसेच 5.4 टक्के पुरुषांमध्ये लठ्ठपणा आढळून येत आहे. महिलांमध्ये लठ्ठपणा आढळून येणार्‍या 197 देशांपैकी भारत 182 व्या स्थानी असून पुरुषांचा विचार करता 180 व्या स्थानी तसेच मुले आणि मुलींच्या बाबतीत 174 व्या स्थानी आहे.

लान्सेटच्या अहवालातून दिसून आलेले हे वास्तव भयंकर चिंताजनक असले तरी त्याबाबत फारसे आश्चर्य वाटण्याचेही कारण नाही. कारण अलीकडील काळात सातत्याने याविषयी बोलले, लिहिले, सांगितले जात आहे. चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या काळातही लठ्ठपणाची समस्या असणार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आणि अनेकांना यामुळे प्राणही गमवावे लागले होते. मध्यंतरी प्रकाशित झालेल्या वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या अहवालातही जीवनशैली, खाण्याच्या सवयी बदलल्या नाहीत तर 2035 पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोक लठ्ठ होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

हा अहवाल तयार करण्यासाठी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय हा आधार घेण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणाचे निकष ठरवून दिले आहेत. यानुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीरात त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होईल एवढी अतिरिक्त चरबी जमा होणे याला लठ्ठपणा म्हणतात. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 च्या वर असेल तर ती व्यक्ती जास्त वजन असलेली आणि बीएमआय 30 च्या वर असेल तर लठ्ठ समजली जाते.

जगभरात वाढत चाललेल्या लठ्ठपणाच्या संख्येचा खुलासा ज्या जागतिक आरोग्य संस्था आणि इंपिरियल कॉलेज लंडनच्या लान्सेट रिपोर्टमध्ये केला आहे, तो अहवाल 33 वर्षांची माहिती गोळा करून तयार करण्यात आला आहे. त्यानुसार 2022 मध्ये जगभरात लठ्ठ व्यक्तींची संख्या ही 88 कोटी झाली आहे. यामध्ये 50 कोटी 40 लाख महिला, 37 कोटी 40 लाख पुरुष समाविष्ट आहेत. लठ्ठपणा या समस्येवर जगभरातील 190 देशांचा हा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये 22 कोटी लोकांच्या वजन आणि उंचीची माहिती गोळा करण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटी 30 लाख हे 5 ते 19 वर्षीय मुलांचा समावेश असून 15 कोटी 80 लाख हे 20 वर्षांपेक्षा अधिक वयाची मुलं आहेत.

यानिमित्ताने दोन घटनांची आठवण करून द्यावीशी वाटते. 1942 साली अमेरिकेमध्ये दुसर्‍या महायुद्धातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लठ्ठ लोकांवर टॅक्स लावावा आणि तो टॅक्स सर्वसामान्य वजनापेक्षा किती जास्त वजन आहे यावर आकारलेला असावा, अशी सूचना डॉ. ए. जे. कार्लसन यांनी केली होती. ती तत्त्वतः सर्वांना मान्य होती. परंतु तिची अंमलबजावणी करणे किती अवघड आहे हे अनेकांनी समजून सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला. परंतु पुढे अमेरिकेत आणि काही युरोपीय देशांमध्ये एका वेगळ्या पद्धतीने लठ्ठपणावर कर लावण्यात आला. ती पद्धत म्हणजे लठ्ठ माणसावर कर लावण्याऐवजी लठ्ठपणा वाढवणार्‍या खाद्यपदार्थांवरचा कर वाढवणे. भारतातसुद्धा हा प्रश्न हळूहळू पुढे येऊ लागला आणि त्याचा विचार करून काही वर्षांपूर्वी केरळ सरकारने लठ्ठपणा वाढवणार्‍या जंक फूडवर 14.5 टक्के एवढा भक्कम कर लावला होता. केरळमध्ये ही कल्पना तिथे नव्याने सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारने राबवली होती.

यापुढच्या काळामध्ये भारतात लठ्ठपणा ही फार मोठी समस्या होणार आहे आणि तिच्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारला काहीतरी करावे लागणार आहे हे या केरळ सरकारच्या करातून सूचित झाले होते. वास्तविक तेव्हा ही कल्पना सरकारने राबवलेल्या एका उपक्रमातून पुढे आली होती. मध्यावधी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी लोकांकडून काही सूचना मागवल्या होत्या आणि सरकारचे करविषयक धोरण काय असावे हे सुचवण्याचे आवाहन केले. त्यातून आलेल्या सूचनांमधून या कराची संकल्पना मांडण्यात आली होती. अशा प्रकारची कर योजना फिनलंड, डेन्मार्क, मेक्सिको, जपान इत्यादी देशामध्ये करण्यात आलेली होती. त्यावरून एका नागरिकाने ही कल्पना केरळ सरकारला सुचवली होती. पण केरळ सरकारने तत्काळ तिची अंमलबजावणी केली. कारण केरळमध्ये मधुमेहींची संख्या वाढत चालली होती. आज संपूर्ण भारतभर मधुमेहींची संख्या वाढत आहे. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, अ‍ॅसिडिटी हे सगळे विकार वाढत्या राहणीमानातून आणि भोगवादी जीवनशैलीतून उद्भवतात.

उत्पन्नाची साधने चांगलीच विकसित झाल्यामुळे लोकांचे शारीरिक कष्ट कमी झाले आहेत. त्याचाच परिणाम होऊन लठ्ठपणा वाढीस लागला आहे. आज भारत ही जगाची मधुमेहींची राजधानी ठरली आहे. लठ्ठपणाबाबत सर्वदूर चर्चा होण्याचे कारण म्हणजे यामुळे उद्भवणारे आजार. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांबरोबरच विशी-पंचवीशीतच गुडघे दुखणे, तिशीत किंवा पस्तिशीत कृत्रिम गुडघे बसवणे असे प्रकार लठ्ठपणामुळे दिसून येत आहेत.

आपल्याकडे काही वर्षांपूर्वी पोट पुढे आलेल्या जाडजूड व्यक्तीकडे समृद्ध आयुष्य जगणारा माणूस म्हणून पाहिले जायचे. परंतु आधुनिक वैद्यकीय मोजमापांप्रमाणे शरीरातील चरबीचे प्रमाण अतिरिक्त असल्यास अशी व्यक्ती अचानक उद्भवणारे किंवा गंभीर आजार तसेच ताणतणावाच्या परिस्थितीशी झुंज देण्यास असमर्थ ठरू शकते, ही बाब मांडली गेली आहे. आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रामध्ये समाविष्ट असणार्‍या आहारपद्धती, जीवनशैलीविषयक मांडणी आणि व्यायाम यांच्याद्वारे व्यक्ती सद़ृढ, निरोगी राहावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. परंतु बदलत्या जीवनचक्राने या सार्‍याचा विसर पडला आणि भौतिक सुखांच्या मागे धावण्याची स्पर्धा सुरू झाली. संगणकीकरणाचे युग आल्यामुळे आणि तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यामुळे शारीरिक श्रमाची कामे आपसूकच कमी झाली. परिणामी रोजच्या हालचाली मंदावत गेल्या आणि शरारीतील चरबीचे ज्वलन होण्याची प्रक्रिया हळूहळू थंडावत गेली. यातून लठ्ठपणा वाढत गेला.

बांधेसूदपणा, सडपातळपणा ही चांगल्या देहयष्टीसाठी वापरली जाणारे विशेषणे मागे पडून बेढब, ओबडधोबड, ओंगळवाणे अशा प्रकारची विशेषणे वापरली जाऊ लागली. कारण आजघडीला भवताली 10 पैकी एक व्यक्ती लठ्ठ या श्रेणीत मोडणारी दिसते.
आता प्रश्न उरतो तो यावर उपाय काय? यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्थूलपणा जडू नये यासाठी काय करावे आणि आधीच स्थूलपणा आलेल्या व्यक्तींनी काय करावे? पण या दोन्हींसाठी उत्तर एकच आहे, ते म्हणजे जीवनशैलीत बदल करणे. आपली जीवनशैली ही अधिकाधिक निरोगी कशी होईल याचा सूक्ष्मपणे अभ्यास करून दिवसाचे नियोजन करणे हाच यावरचा उपाय आहे.

वैद्यकीय दृष्ट्या विचार केल्यास रात्री लवकर झोपणे, सहा ते सात तासांची शांत झोप घेऊन पहाटे लवकर उठणे, अंग भरून व्यायाम करणे, यामध्ये पळणे, दोरीच्या उड्या, जिने चढउतार करणे, वजने उचलणे यांसारख्या घाम येणार्‍या व्यायामांपासून ते योगासनांपर्यंतचे सर्व व्यायाम करणे, तेलकट-तूपकट, मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करून जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थांनी युक्त असा आहार घेणे, आहारात साखर-मीठ-मैदा या पांढर्‍या पदार्थांचा समावेश नगण्य करणे गरजेचे आहे. याखेरीज ताणतणावमुक्त कसे जगता येईल यासाठी नियमित ध्यानधारणा करण्यानेही लठ्ठपणासह अनेक समस्या कमी होऊ शकतात.

चिंतेची बाब अशी की, हे एक दुष्टचक्र असते. म्हणजे स्थूलपणा वाढला की व्याधी जडतात आणि त्या व्याधी कमी करण्यासाठी व्यायामादी उपचार करायचे म्हटले तर स्थूलपणा आडवा येतो. या दुष्टचक्रात अडकून बराच काळ गेल्यास व्याधी गंभीर अवस्थेत पोहोचतात. त्यातून गुंतागुंत वाढते. त्यामुळेच पारंपरिक, सकस, कमी चरबीयुक्त आहार वेळेवर घेणे, झोपेचे नियम पाळणे, तणावमुक्त राहण्यासाठी ध्यानधारणा करणे आणि भरपूर व्यायाम करणे अशी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारणे ही काळाची गरज आहे. शेवटी सर सलामत तो पगडी पचास! याखेरीज व्यापक पातळीवर स्थूलपणा वाढवणार्‍या उत्पादनांवर कर वाढवण्याचा विचारही शासनाने करायला हवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news