सलग दोन निवडणुकांत एकहाती विजय मिळवणार्या भाजपला उत्तर महाराष्ट्रात विजयी हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी घाम गाळावा लागणार असल्याचे तर मोदी लाट निष्प्रभ ठरवून विजयपताका फडकावण्याचा विडा उचललेल्या विरोधकांपुढे तीनही पक्षांच्या ऐक्याची वज्रमूठ आवळण्याचे आव्हान राहणार असल्याचे चित्र तूर्तास दिसत आहे. याच अनुषंगाने पंचेचाळीस प्लसचे स्वप्न उराशी बाळगणारे सत्ताधारी आणि मराठी मुलखात विरोधक नामक व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारी महाविकास आघाडी या दोहोंनाही मतदारराजाच्या दातृत्वावर शत-प्रतिशत अवलंबून राहण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार आहे. कोणत्याही लाटेवर स्वार होऊन विजयी होण्याची शक्यता दोहो घटकांसाठी नसण्याच्या बरोबर असल्याचाही प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या सहाही ठिकाणी गेल्या दोन्हीही निवडणुकांत तत्कालीन भाजप-शिवसेना उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजयाची नोंद केली होती. यंदा भाजपच्या वाट्याला आलेल्या पाच मतदार संघांत जळगाव वगळता उर्वरित पाच ठिकाणी मागील चेहर्यांनाच संधी देण्यात आली आहे. भाजपने जळगावच्या उन्मेष पाटलांना कात्रजचा घाट दाखवत तिथे स्मिता वाघ यांना पसंती दिली आहे. सलग दोनदा शिवसेना उमेदवारांनी चढ्या मताधिक्याने विजय मिळवलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
आधीच्या निवडणुकांतील विजयालेख कायम ठेवण्याचा यंदा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठी मोदी गॅरंटी, डबल इंजिन सरकार, दोन्ही सरकारांनी साकारलेली विकासकामे या मुद्द्यांची ढाल पुढे करण्यात येत आहे. तथापि, हे मुद्दे समजण्याजोगे असले तरी शेतकर्यांचे प्रश्न, कांदा निर्यातबंदी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, पिण्याची पाण्याची समस्या, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे कृषिबहुल मतदार संघांत कळीचे ठरताहेत. त्याची उत्तरे देताना 'अब की बार…'च्या घोषणा देणार्यांना नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.
विरोधकांचा विचार करता उपरोक्त सहा मतदार संघांपैकी प्रत्येकी दोन ठिकाणी शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. प्राथमिक अंगाने सत्ताधार्यांच्या शास्त्रोक्त सूक्ष्म नियोजनापुढे विरोधकांचे नियोजन ढेपाळलेले वाटत आहे. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला येनकेन प्रकारे निवडणूक जिंकायचीय, ही दृढनिश्चयी भावनाच विरोधकांत हरवलेली दिसते आहे. नेमकी कोणाच्या नावावर मतं मागायची, ही विरोधकांतील मुख्य समस्या आहे. केवळ मोदी-शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाला दूषणे देत मतांची झोळी भरणार नाही, याची जाणीव असल्याने विरोधक सध्या संभ्रमित आहेत.
सत्ताधारी काय किंवा विरोधक, सर्वांना एक जाणीव झाली आहे, ती म्हणजे पक्षाच्या चिन्हावर अथवा भावनिक साद घालून मतं मिळवण्याचे दिवस आता संपले आहेत. माझ्या मतदानाने माझे, माझ्या कुटुंबाचे आणि एकूण समाजाचे नेमके कोणते क्षेम साधले जाणार आहे, हा विचार मनाला शिवणारा मतदार आज तयार झाला आहे. याच अनुषंगाने निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे मतदाराला आपलेसे कसे करायचे, यावरील मंथनापोटी सत्ताधारी आणि विरोधकांची कसोटी लागणार, हे मात्र निश्चित.
नाशिक : महायुती उमेदवार विरुद्ध राजाभाऊ (पराग) वाजे (शिवसेना उबाठा गट); दिंडोरी : डॉ. भारती पवार (भाजप) विरुद्ध भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट); धुळे : डॉ. सुभाष भामरे (भाजप) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव (काँग्रेस), नंदुरबार : डॉ. हिना गावित (भाजप) विरुद्ध अॅड. गोवाल पाडवी (काँग्रेस); जळगाव : स्मिता वाघ (भाजप) विरुद्ध करण पवार (शिवसेना उबाठा गट); रावेर : रक्षा खडसे (भाजप) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट).
महाविकास आघाडीच्या जागावाटपात धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. इथे पक्षाच्या वतीने नाशिक आणि धुळे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे डॉ. तुषार शेवाळे व श्याम सनेर तिकिटासाठी प्रमुख दावेदार होते. तथापि, अखेरच्या टप्प्यात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव अनपेक्षितपणे जाहीर झाल्याने दोन्ही दावेदार खट्टू झाले. दोहोंनीही पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड पुकारून पदांचे राजीनामे सुपूर्द केल्याने पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. ऐन निवडणूक तोंडावर असताना निर्माण झालेला हा पेच सोडवण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धावाधाव करावी लागली. त्यांनी नाशिक मुक्कामी डॉ. शेवाळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. थोरात यांची शिष्टाई सफल होते का, याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागून राहणार आहे.