मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस 24 डब्यांच्या चालविण्यासाठी सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ते 14 च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणाच्या कामासाठी शुक्रवार आणि शनिवार रात्री ब्लॉक घेण्यात आल्याने सीएसएमटी ते पनवेल आणि कल्याण दरम्यानच्या अप-डाऊन मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या.
परिणामी रात्री उशिरा कामावरुन सुटलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी पर्यायी साधनांवर अवलंबून राहावे लागले. उन्हाळी सुट्टीमुळे गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना रात्रीच्या लोकल उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागला.
सीएसएमटी स्थानकातून लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस ये-जा करतात. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10, 11, 12, 13, 14 या पाच प्लॅटफॉर्मवरून सध्या 12 आणि 18 डब्यांच्या गाड्या धावतात. मात्र, वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता या प्लॅटफॉर्मचा विस्तार 24 डब्यांच्या गाड्या धावण्यासाठी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. त्यानुसार सध्या अंतिम टप्यातील कामे सुरू आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 ची सध्याची लांबी 298 मीटर असून विस्तारीकरणानंतर ती 680 मीटर इतकी होईल. प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13, 14 ची सध्याची लांबी 385 मीटर असून विस्तारीकरणानंतर ती 690 मीटर होईल.
प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप-डाऊन धिम्या-जलद तसेच सीएसएमटी-वडाळा दरम्यान अप-डाऊन मार्गावर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात आला होता. मध्यरात्री 12:30 ते पहाटे 04:30 वाजेपयर्ंत ब्लॉक होता.या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून डाऊन धिम्या मार्गावर शेवटची कसारा लोकल 12.14 वाजता तर हार्बर मार्गावर सीएसएमटीहून रात्री 12:13 वाजता पनवेल लोकल चालविण्यात आली. त्यानंतरच्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या.
मेन लाईनवर 12.20 ची कुर्ला, 12.24 ची कर्जत, 1.28 ची ठाणे आणि 12.31 ची एसी कुर्ला लोकल या गाड्या रद्द केल्या. त्यामुळे मेन लाईनवरुन रात्री उशिरा घरी जाणार्या प्रवाशांचे हाल झाले. हीच परिस्थिती हार्बर मार्गाची होती. सीएसएमटीहून पनवेल दिशेकडील रात्री 12.17 ची बांद्रा, 1.24 ची पनवेल,12.30 ची बांद्रा आणि रात्री 12.40 ची पनवेल लोकल रद्द केली होती. यामुळे हार्बर मार्गावरुन उशिरा प्रवास करणार्या प्रवाशांना रस्ते मार्गाने जादा पैसे देऊन प्रवास करावा लागला.
सध्या उन्हाळी हंगाम सुरु असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी गावी जात आहेत. अनेक लांब पल्याच्या गाड्या रात्री उशिरा किंवा पहाटे सुटतात. या गाड्या पकडण्यासाठी प्रवासी रात्रीच रेल्वे टर्मिनलवर येतात. परंतु मेन लाईन आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या अनेक लोकल रद्द केल्याने या प्रवाशांना खासगी टॅक्सीचा आधार घ्यावा लागला.