वेलिंग्टन ः वृत्तसंस्था येत्या 5 ऑक्टोबरपासून वन डे वर्ल्ड कपचा थरार भारतात रंगणार असून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र, या वर्ल्ड कपआधी न्यूझीलंडचा संघ दुखापतींच्या समस्येशी झुंजत आहे.
नियमित कर्णधार केन विल्यम्सन याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. हे कमी म्हणून की काय आता वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या रूपाने संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्याच्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याला खेळता येणार काय, याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाईल. शनिवारी लॉर्डस्वर झालेल्या अंतिम वन डेत साऊदीला दुखापत झाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने बुधवारी दुपारी या वृत्ताला दुजोरा दिला.
टीम याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर न्यूझीलंड संघाला काळजीचे फारसे कारण उरणार नाही. मात्र, तसे झाले नाही तर त्यांना नव्या खेळाडूचा शोध घ्यावा लागेल. डॉक्टरांच्या अहवालानंतर 34 वर्षीय साऊदीची निवड केली जाणार असल्याचे न्यूझीलंडच्या क्रिकेट मंडळाने सांगितले. संघ अनेक दुखापतींशी झुंजत असल्यामुळे संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना आशा आहे की, साऊदी वेळेत बरा होईल. स्टेड म्हणाले, आम्हाला खात्री आहे की, शस्त्रक्रिया यशस्वी होईल.