पुढारी ऑनलाइन डेस्क : NCP Meet Sharad Pawar Group Meet : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मुंबई येथे आज मेळावा घेण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर तीव्र हल्लाबोल केला. ते म्हणाले शिवसेने सोबत गेले आणि भाजपसोबत गेले यामध्ये फरक आहे. भाजपचं हिंदुत्व जातीयवादी, विभाजनवादी, मनुवादी आणि विखारी आहे. भाजपकडून विरोधी पक्ष सोडण्याचे काम सातत्याने केले. तर शिवसेनेचे हिंदुत्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणं हे आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जाणे आणि भाजपसोबत जाणे यामध्ये फरक आहे.
इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांचे समर्थन केले होते. तसेच इंदिरा गांधी यांच्या समर्थनासाठी त्यांनी शिवसेनेकडून एक उमेदवार निवडणुकीत दिला नव्हता. याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.
ते पुढे म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंत काम करत आहे. 24 वर्षांपूर्वी पक्षाचा जन्म झाला. 24 वर्षात राष्ट्रवादीने राज्यभर नेतृत्व उभं केले. नवीन नेते तयार केले. या 24 वर्षात पक्षाचे एकच ध्येय होते महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. आज संपूर्ण देश आमच्याकडे पाहत आहे… राष्ट्रवादीसाठी ही सभा ऐतिहासिक आहे. आमच्या मार्गात अडथळे असूनही आम्हाला वाटचाल करत राहावे लागेल. आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले.
आम्हाला सत्तेची भूक नाही; आम्ही लोकांसाठी काम करत राहू असे म्हणत पवार पुढे म्हणाले, केंद्रात मी अनेकदा काम केले. देशातील जनतेच्या मनात अस्वस्थता आहे. लोकांसाठी कार्य करताना संवाद साधावा लागतो. मात्र, देशात सध्या संवाद संपला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी संवाद महत्वाचा असतो.
फुटीर गटाने पक्ष ताब्यात घेणं हे लोकशाहीत योग्य नाही. मी वेगळा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसची प्रॉपर्टी सोडून दिली. काँग्रेसच्या मालमत्तेवर मी दावा केला नाही. काही जणांनी मेळाव्यात माझा फोटो सगळ्यात मोठा लावला कारण माझे फोटो वापरल्याशिवाय त्यांचं नाणं चालणार नाही, हे त्यांना माहित नाही.
आतापर्यंत अनेक चिन्हांवर निवडणूक लढवली. त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्ह आम्ही जाऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. तसेच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हे कृत्य केलं. भूजबळांनी बघून येतो सांगितलं आणि तिकडे जाऊन शपथ घेतली.
अनेकांनी वेगळी भूमिका घेतली माझी काही तक्रार नाही. मात्र, सर्वोच्च पदावरील नेत्यांनी विचार करून बोलावे. राज्यकर्ते हवे तसे बोलतात आणि जनतेला दिशाभूल करतात. मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे. मला गुरू म्हणायचे आणि आरोप करायचे, लोकशाहीच्या दृष्टीने हे योग्य नाही.
नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पक्ष असे म्हटले होते. मग त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत कसे घेतले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्याच्या इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
हे ही वाचा :