Navratri ustav : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडची गडदेवता वासिनी देवी शिरकाई

देवी शिरकाई
देवी शिरकाई
Published on
Updated on

नाते (महाड) : इलियास ढोकले : हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री. शिरकाई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी श्री. शिरकाई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही  कायम आहे. गडदेवता म्हणून पेशवेकालीन दप्तरांमध्ये देखील शिरकाई देवीची नोंद आहे. शिरकाई म्हणजे, महिषासुरमर्दिनीची अत्यंत रेखीव दगडी मूर्ती मंदिरामध्ये आहे. दररोज देवीची विधिवत पूजा करण्यात येते.

शिर्के घराण्याची कुलदेवता

किल्ले रायगडावरील गंगासागर तलावाकडून नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर शिरकाई देवीचे मंदिर आहे. देवीच्या मंदिरासमोरच होळीचा माळ असून डाव्या बाजूस असलेला चौथरा शिरकाई देवीचा घरटा म्हणून ओळखला जातो. घरट्याच्या मागे उंबराच्या झाडांच्या दाटींमध्ये शिरकाई देवीचे मंदिर आहे. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता मानली जाते. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडले असावे, असा संदर्भ इतिहासात आहे.

शिरकाई देवीची मूर्ती अष्टभूजा असलेली महिषासुरमर्दिनी भवानीची आहे. मूर्ती शिवपूर्वकालातील असावी, माधवराव पेशव्यांचे सरदार आपाजी हरी यांनी १७७३ मध्ये रायगड किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा प्रथम शिरकाई देवीचे दर्शन घेतल्याची, नव चंडिकायाग केल्याचा उल्लेख आहे. नवरात्रामध्ये घट उठल्यानंतर शिरकाई देवीच्या गोंधळ होई. १७८६ मध्ये हा गोंधळ विधी बंद करण्यात आला.

गडाच्या माथ्यावर राजमहालाजवळ शिरकाई मातेचे  मंदिर आहे. मोरे याच्याकडून जावळी सुभा स्वराज्यात आल्यावर रायगड शिवशाहीत आला. त्यावेळी गडावर अनेक कामे करण्यात आली. इमारती उभ्या राहिल्या त्याचवेळी शिरकाई देवीचे मंदिर बांधण्यात आले. शिवकाळात या मंदिराला अतिशय महत्वाचे स्थान होते. नंतरच्या काळात रायगड संकटात सापडला गडावर अनेक घडामोडी घडल्या; पण १७७३ नंतरच्या काळात अप्पाजी हरी याने रायगड पुन्हा ताब्यात घेतल्यापासून पेशवाईत गड पुन्हा नांदता झाला.
आदीमाया माता शिरकाई ही रायगडावरील प्रमुख देवता आहे. १७७३ मध्ये सप्टेंबर महिन्यात इथे नवचंडीचा होम करण्यात आल्याचा उल्लेख दप्तरात सापडतो. देवीच्या खर्चास उत्पन्न लाऊन देण्यात येत असे. ८ आक्टोबर १७७५ मध्ये महाड येथून दोन चांदीचे मुखवटे शिरकाई देवीसाठी खास करुन घेऊन गडावर पाठवल्याची नोंद पहावयास मिळते.

नवरात्र उत्सव देवीचा मोठा उत्सव

नवरात्र उत्सव हा देवीचा मोठा उत्सव रायगडावर साजरा होत असे. नवरात्रात देवीचे घट बसत, सतत नऊ दिवस उत्सव साजरा होत असे. नंदादीप हरीकिर्तन नऊ दिवस गडावर चालत असे. किर्तनाचे कामगीरीवर बिरवाडी येथील योगी यांची नेमणूक होत असे. उत्सव काळात देवीजवळ दोन नातेकर उपाध्ये देवीच्या जपास नऊ दिवस अहोरात्र बसत असत. महाड येथून खास जिनगर देवीचे मखर सजविण्यासाठी कलाभूती वेगवेगळ्या रंगाचे विलायती कागद पताका घेऊन गडावर देवीचे मखर सजवून देत असे. त्याला सरकारांतुन बिदागी मिळत असे.

दसऱ्याचे दिवशी देवीच्या पुढील भव्य सभामंडपात ब्राम्हण भोजन होत असे. रायगड परिसरांतील मान्यवर ब्राम्हण या भोजनास खास निमंत्रीत करत. पाचाडकर- जोशी देवीजवळ नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचत असत. नऊ दिवस राजघराण्यांतील स्त्रिया देवीची ओटी खणानारळाने भरत असत. देवीचा गोंधळ घालण्यासाठी महाड येथील ग्राम दैवत श्री. विरेश्वर महाराज या देवस्थानचा गोंधळी गडावर जाऊन गोंधळ घालत असे. त्याच प्रमाणे नाते येथील मातंग समाज्याचे गोंधळी मानकरी म्हणून आई माता शिरकाई देवीचा गोंधळ घालत असत.

देवीच्या उत्सवांतील हरी किर्तनाची हरदासाची बिदागी प्रसाद मृदुंगाची कणीक, खोबरे, नारळ, विड्याची पाने, खारीक इत्यादी सर्व खर्च सरकारांतून होत असे. सन १७७० च्या नोंदीवरुन भाताचा दर एकखंडी भातास रुपये पंधरा होता. देवी शिरकाई नवसास पावणारी भोसल्याची पाठराखण होती. म्हणून गडकरी मंडळीचा तिच्यावर जीव होता. वर्षभर शिरकाई देवीचे सण उत्सव साजरे होत. समोरील सभामंडप अपुरा पडत असे. उत्सवावेळी देवीस तोफांची सलामी देण्यात येत असे. देवीच्या सभा मंडपासमोर तोफ सजवलेली असे. गडावर अतिशय नावाजलेल्या तोफा होत्या. अचूक माऱ्याबद्दल त्या तोफांची ख्याती होती. रायगडावर गंगासागर, मुल्लांना, पेरुजंगी, भुजंग, रामचंडी, पदाणी, फत्तेलष्कर, फत्तेजंग सुंदर, रेकम, मुंगशी शिवप्रसाद गणेश, लंगडा कसाब, चांदणी भवानी, नागीण इत्यादी युद्धात नाम कमावलेल्या अचुक मारा करणाऱ्या तोफा होत्या. अप्पाजी हरी याने देवी जाखमाता बुरुजावर पहारा देणारी लंगडा कसाब ही तोफ मोठ्या प्रयत्नाने रायगडावर नेली.

शिरकाई देवीचे पोत्यास सुत

नवरात्र उत्सवात शास्त्री पंडीतांना गडावर निमंत्रीत करत असत. हरदास त्र्यंबक जोशी पाबळकर व त्यांचे सात सहकारी १७७३ मधे गडावर आले होते. श्रावणी पोर्णिमेस श्री. शिरकाई देवीचे पोत्यास सुत वगैरे खजिन्यातुन देण्यात येत असे. गडावर धार्मिक सण, उत्सव साजरे होत असत. दिवाळीला ओवाळणीसाठी वाडीच्या परटणी कुणबीणी येत असत. यासाठी सालिना चार आणे खर्ची पडत. तुळसीचे लग्न, संक्रांत, हुताशनी हे सोहळे साजरे होत. देवीपुढे सकाळ-संध्याकाळ सनई चौघडा वाजविण्यात येत असे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news