नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंजाब काँग्रेसमध्ये वाढलेल्या अंतर्कलहाच्या पार्श्वभूमीवर माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू भाजपमध्ये परतण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा ११ फेब्रुवारीला पंजाबमध्ये कार्यक्रम आहे. त्याच दिवशी सिद्धूंचा पक्षांतराचा मुहूर्त असू शकतो, असे समजते.
गेल्या काही महिन्यांपासून पंजाब कॉंग्रेसमध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग वारिंग आणि माजी प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यातच सिद्धू यांनी कॉंग्रेसच्या मेळाव्यांच्या समांतर मेळावे सुरू केल्याने कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. अलीकडेच सिद्धू यांनी काँग्रेसच्यानिवडणूक समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. दुसरीकडे, "क्षमता असणाऱ्यांचे जग कौतुक करेल, केवळ टाचा उंच केल्याने उंची वाढत नाही", अशा आशयाची खोचक पोस्ट सिद्धू यांनी ३१ जानेवारीला केली होती. तेव्हापासून सिद्धू पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे कॉंग्रेसमधून सांगितले जात आहे.
दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांच्या या पदानंतर पंजाबपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या संभाव्य नव्या गंतव्यस्थानाबाबत वेगवेगळे कयास लढविले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू भाजपमध्ये 'घरवापसी' करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात त्यांची भाजपशी चर्चाही अंतिम टप्प्यात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात, सिद्धू यांनी याबाबत औपचारिक दुजोरा दिलेला नाही.