नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सशस्त्र दलाच्या सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरूवारी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. लष्करी परिचर्या सेवेच्या (एमएनएस) अतिरिक्त महासंचालक (एजीडी) मेजर जनरल स्मिता देवराणी आणि ब्रिगेडियर एमएनएस, मुख्यालय, दक्षिणी कमांड ब्रिगेडियर अमिता देवराणी यांना अनुक्रमे २०२२ आणि २०२३ वर्षांसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १९७३ मध्ये राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराची सुरुवात केली.
परिचारिका आणि परिचर्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी समाजासाठी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.चार दशकांच्या उल्लेखनीय योगदान आणि सेवेचा सन्मानार्थ देवराणी भगिनींना या पुरस्काराने गौरन्विण्यात आले आहे.मेजर जनरल स्मिता देवराणी यांची १९८३ मध्ये एमएनएस मध्ये नियुक्ती झाली. तर, ब्रिगेडियर अमिता देवराणी यांची १९८६ मध्ये सेवेत नियुक्ती झाली.
प्राचार्य, नर्सिंग महाविद्यालय, सशस्र दल वैद्यकीय महाविद्यालय, पुणे; नर्सिंग महाविद्यालय, लष्करी रुग्णालय, संशोधन आणि संदर्भ आणि उपप्राचार्य, नर्सिंग महाविद्यालय, भारतीय नौदल रुग्णालय जहाज (आयएनएचएस) अश्विनी अशा विविध महत्त्वाच्या पदांवर यापूर्वी त्यांनी काम केले आहे. दोन्ही बहिणी उत्तराखंडमधील कोटद्वार जिल्ह्यातील आहेत.