Nanded News : नायगाव येथे एसबीआय बँकेत थरार; अधिकाऱ्यावर सुरक्षा रक्षकाचा चाकूहल्ला

file photo
file photo

नायगाव: पुढारी वृत्तसेवा : नोकरीवरून काढून टाकल्याचा रागातून सुरक्षा रक्षकाने बँक अधिकाऱ्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. ही थरारक घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नायगाव बा. शाखेत आज (दि.१) दुपारी तीनच्या सुमारास घडली. बँकेच्या कॅबिनमध्येच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर सुरक्षा रक्षकाला कर्मचारी आणि ग्राहकांनी दार बंद करून ताब्यात घेऊन नायगाव पोलिसांना कळवले. दरम्यान, पोलीस कर्मचारी सांगवीकर यांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. यावेळी त्यांनाही दुखापत झाली.
सहायक प्रबंधक कपिल आनंदराव गोमाशे असे जखमी बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. तर संशयित आरोपी माजी सैनिक असून गोविंद सुभाष गायकवाड असे त्याचे नाव आहे. Nanded News

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी गोविंद गायकवाड हा मास्को कंपनीच्या माध्यमातून एसबीआय बँकेच्या शाखा क्र. १ येथे नोकरीवर लागले होते. काही दिवसांपासून ते दररोज दारू पिऊन कर्मचारी, ग्राहक यांच्यासोबत भांडण करत. त्यामुळे सहायक प्रबंधक कपिल गोमाशे यांच्यासोबत त्याचा वाद झाला होता. त्यानंतर गायकवाड याला १२ फेब्रुवारीपासून नोकरीवरून कमी करण्यात आले होते. हा राग मनात धरून गायकवाड आज दुपारी अचानक बँकेत येऊन एक तासभर चकरा मारत होता. त्यानंतर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचे पाहून गायकवाड याने गोमाशे यांच्यावर चाकूने हल्ला केला. ते खाली झुकल्यानंतर चाकूचा वार गळ्यावर न लागता गालावर लागला. त्यात ते गंभीर जखमी झाले. Nanded News

या घटनेनंतर शाखाधिकारी कुमार सौरभ व कर्मचारी यांनी तत्काळ दरवाजे बंद केले. नायगाव पोलिसांना कळवले. तातडीने पोलीस कर्मचारी सांगवीकर व इतर कर्मचारी दाखल झाले. गायकवाड हे धिपाड शरीराचे असल्याने त्यास कोणीही पकडण्यासाठी पुढे आले नाहीत. सांगवीकर यांनी गायकवाड यांच्या पाठीमागून मानेवर हात घालून पकडले. यात त्यांच्या डाव्या हातास इजा पोहचली.

शाखाधिकारी कुमार सौरभ यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले. तत्काळ नांदेड येथील मुख्य शाखेतून रामामुर्ती, सेक्युरिटी व्यवस्थापक रुपेश शांभरकर बँकेत दाखल झाले. गोमाशे यांच्या तक्रारीनंतर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सांगवीकर करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news